Wednesday, May 7, 2025

महामुंबईठाणे

UPSC Exam : यूपीएससीच्या परीक्षार्थींसाठी ठाण्यात विशेष अभियान

UPSC Exam : यूपीएससीच्या परीक्षार्थींसाठी ठाण्यात विशेष अभियान

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम


ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (Central Public Service Commission) नुकत्याच झालेल्या पूर्व परीक्षेच्या काळात परीक्षार्थींसाठी ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने विशेष माहिती अभियान राबवले. त्यात पूर्व परीक्षेसाठी ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रांवर सर्व परीक्षार्थींना चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची आणि प्रवेश परीक्षेची माहिती देण्यात आली.


प्रत्येक परीक्षा केंद्रातील परीक्षार्थींना संस्थेची माहिती, संस्थेतील अभ्यासासाठी असलेल्या सुविधा, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, विद्यावेतन यांची माहिती असलेले पत्रक देण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मुख्य परीक्षेकरीता संस्थेचे असलेले मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा, संस्थेचा व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्ग यांची माहिती देण्यासोबतच संस्थेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थीं यांची नावनोंदणी करण्यात आली. या अभियानासाठी अधिकारी आणि कर्मचारी अशी ६० जणांची टीम कार्यरत होती.


ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे एकूण २५ परीक्षा केंद्राबाहेर संस्थेची माहिती देण्यासाठी बूथ तयार करण्यात आले होते. या अभियानाला विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ४,९०५ परीक्षार्थींपर्यंत त्या निमित्ताने संस्थेला पोहोचण्यात यश मिळाले. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव भाप्रसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त उमेश बिरारी आणि संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष माहिती अभियान आयोजित करण्यात आले होते.


संस्थेची प्रवेश परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. दरम्यान रविवार, २३ जून रोजी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची प्रवेश परीक्षा होणार आहे. यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी/प्रशिक्षणार्थींनी संस्थेच्या प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करावी. त्यासाठी https://forms.epravesh.com/CDInstitute/ या लिंकवर गुरूवार २० जूनपर्यंत नावनोंदणी करता येईल. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.


ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. अशा पद्धतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.

Comments
Add Comment