Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअपघातांचे पुणे शहर

अपघातांचे पुणे शहर

पुणे तिथे काय उणे, असे पुणे या शहराबाबत अभिमानाने बोलले जात असायचे. शिक्षणाचे माहेरघर असेही पुण्याला संबोधले जात आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्रीय जनतेचे श्रद्धास्थान म्हणून जाणल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे; परंतु शिवरायाचे बालपणही पुणे शहरातच लाल महालात गेले आहे. शिवछत्रपतींच्या भोसले घराण्यांने ज्यावेळी स्वराज्याचा कारभार हाकण्याची जबाबदारी पेशव्यांवर सोपविली, त्या पेशव्यांनी स्वराज्याचा कारभारही पुणे शहरातील शनिवार वाड्यातूनच चालविला. संत तुकाराम महाराजांची देहूदेखील या पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावरच आहे.

पुणे शहराला हजारो वर्षाचा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे शहर आता अलीकडच्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे अपघातांचे माहेरघर असे संबोधले जाऊ लागले आहे. सध्या पुण्यामध्ये कोट्यधीश बिल्डर परिवाराच्या घरातील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताचे प्रकरण ‘हिट अॅण्ड रन’ महाराष्ट्र राज्यात गाजत आहे. अल्पवयीनने अपघात केलेला असतानाही ते प्रकरण दडपण्यासाठी अल्पवयीनचे आजोबा, आई-वडील यांनीही नको ते उद्योग केल्यामुळे आज ते तुरुंगामध्ये आहेत. पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरांने आलिशान पोर्शे कारने दारूच्या नशेत कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिरडून मारल्यानंतर पुण्यामध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच व्यवस्था सुद्धा कशी पोखरली गेली आहे याचाही नमुना समोर आला. या प्रकरणात कायदेशीर कारवाईने वेग घेतला असला, तरी पुण्यामधील रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये किंचितही सुधारणा झालेली नाही.

वाहतूक कोंडीने शहराचा जीव गुदमरत असतानाच भरधाव वाहनांच्या खाली चिरडवून मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पुण्यामध्ये सरासरी तीन अपघात गेल्या २५ दिवसांमध्ये झाले आहेत. त्यामध्ये ३१ जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इतकेच नव्हे तर ५४ जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे जे गंभीर आहेत त्यांना सुद्धा आता आयुष्यभर अपंगत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. १९ मे ते १४ जून २०२४ या कालावधीमध्ये पुण्यामध्ये तब्बल ७० अपघात घडले आहेत. या अपघातांना सर्वाधिक पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांचा वेग पुणेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहने चालवण्याची संख्या सुद्धा मोठी आहे. अपघात झालेल्या सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला नसला, तरी काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर काही चालक अजूनही फरार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे.

पुण्यामध्ये एका बाजूने अपघातांची मालिका सुरूच असताना पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष सुद्धा संतापात भर घालणारे होत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. लोकांनी रेटा वाढवल्यानंतर कारवाईला वेग आला होता. त्यापूर्वी हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न झाला होता. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा हिट अॅण्ड रनच्या घटना घडल्या. यामध्ये सुद्धा पोलिसांनी स्वतःहून कारवाई केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुण्यामधील वाहतूक कोंडी आणि भरधाव वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. पुण्यात आता असा एक दिवस जात नाही की, त्या दिवशी अपघात होत नाही आणि अपघातात मृत्यू होत नाही. पुण्यातील धानोरी परिसरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका चारचाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षात थांबलेले चौघेजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. आरोपी कारचालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आईस्क्रिम खाण्यासाठी रिक्षाचालक थांबला होता. यावेळी रिक्षामध्ये दोन महिला, लहान मुलगी आणि रिक्षाचालक असे चौघेजण होते. याच दरम्यान पोरवाल रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षातील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

आता गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटना वाढू लागल्याने पुणेकरांनाही वाढत्या अपघाताबाबत भीती व चिंता वाटू लागली आहे. घराबाहेर कामानिमित्ताने बाहेर दुचाकी व चारचाकी घेऊन बाहेर पडणारे पुणेकर पुन्हा रात्री घरी व्यवस्थित येतील की नाही, इतकी अपघातांची दहशत या शहरामध्ये पसरली आहे. अर्थांत शहरामध्ये वाढत्या अपघातांना व अपघातामुळे पुणे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याच्या प्रकाराला पुणेकर तितकेच जबाबदार आहेत. ज्यावेळी पोलिसांनी महाराष्ट्रात दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्ती केली, हेल्मेट सक्ती ही चालकांच्या सुरक्षेसाठीच होती.

अपघात झाला तरी चालकाचे किमान डोके तरी सुरक्षित असावे, हा त्या हेल्मेट सक्ती मागील हेतू होता. पण पुणेकरांना त्बाबाबत तितकेसे गांभीर्य नाही. हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकर संघटित होऊन रस्त्यावर उतरले आणि हेल्मेट सक्ती पुणे परिसरात शिथिल करणे प्रशासनाला भाग पडले. पुणेकरांना अलीकडच्या काळात वेगाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि हेच वाढते आकर्षण आज अपघाताना खतपाणी घालू लागले आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला अपघाताचे शहर हा कलंक पुसण्याची वेळ आलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -