Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Rice Farming : बळीराजा सुखावला! लहरी पावसातही भाताचे राब पूर्ण

Rice Farming : बळीराजा सुखावला! लहरी पावसातही भाताचे राब पूर्ण

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची ओढ

कर्जत : कर्जत (Karjat) तालुक्यात भाताची शेती (Rice farming) खरीप प्रामुख्याने केली जाते. गेल्या अनेक दशकांचा अंदाज पाहता, मान्सूनची सुरुवात ७ जून रोजी होत असते. त्यानुसार भाताचे राब शेतकरी वर्ग तयार करण्यास घेत असतो. त्यानुसार कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली राब पेरणीची कामे पूर्ण केली आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली असल्याची माहिती कर्जत तालुका कृषी विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान भाताचे बियाणे जमिनीच्यावर आले असून, अनेक ठिकाणी भाताच्या राबामुळे शेतातील काही भाग हिरवागार दिसू लागला आहे.

भाताच्या शेतीचे कोठार म्हणून कधी काळी कर्जत तालुका ओळखला जात होता. त्यात १९८०च्या दशकात कर्जत तालुक्यात फार्महाऊस सुरू झाले आणि कर्जत तालुक्यातील भाताचे क्षेत्र कमी झाले, तरीदेखील कर्जत तालुक्यात खरीप हंगामात साधारण दहा हजार हेक्टरवर भाताची शेती केली जाते. उन्हळ्यात रगबी हंगामात देखील किमान दोन हजार हेक्टर जमिनीवर भाताची दुबार शेती केली जाते. मात्र शेतकरी वर्ग मे महिन्याच्या अखेरीस भाताची मशागत सुरू करीत असतो. त्यानुसार पहिल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन, ५ जूनपासून शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे यांची पेरणी सुरू केली होती. त्यानुसार भाताचे राब भरणी करण्याचे काम कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. भाताच्या राबासाठी लागणारे पावसाचे पाणी काही दिवस सुरू आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आलेल्या भाताच्या बियाणांचे उगवणे प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बळीराजा खूश असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत खरेदी विक्री संघ, कर्जत भात संशोधन केंद्र आदी ठिकाणी भात बियाणे यांची विक्री सुरू होती. त्याचवेळी कृषी औषध विक्रेते यांच्याकडे देखील भाताचे बियाणे उपलब्ध होते, तर काही शेतकरी हे आपल्या शेतामधील भाताच्या पिकातील भातदेखील बियाणे म्हणून ठेवून देत असतात. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी राब भरणी करून घेतली असून, पेरण्यांसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतीची कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. त्यात अनेक भागांत भाताच्या बियाणे यांनी जमिनीच्यावर डोके काढले आहे. आपल्या शेतात भाताचे रोप आलेले पाहून, बळीराजा देखील खूश झाला असल्याचे दिसून येत आहे. समाधानकारक पाऊस यामुळे बळीराजा समाधानी असून, आता भाताचे बियाणे यांनी देखील जीव घेतला असल्याने शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची ओढ लागली आहे.भाताच्या रोपांसाठी पाऊस झाला आहे. आता भाताच्या चांगल्या रोपांसाठी चांगल्या पावसाची गरज असून, शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची ओढ लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >