वटवृक्षाच्या संवर्धनासाठी सुहासिनीचा खारीचा वाटा
प्रशांत सिनकर
ठाणे : वडाच्या झाडाच्या संवर्धनासाठी सुहासिनी पुढाकार घेणार आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या कापल्याने झाडाचे नुकसान होत असल्याने, घरात फांदी ऐवजी प्रतिकात्मक वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून वटपौर्णिमा साजरी करून, पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा सुहासिनी उचलणार आहेत. ठाण्यात वड पिंपळ उंबर अशा स्थानिक झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असून, घरा जवळ वटपौर्णिमेला वडाचे झाड दिसण दुर्लभ झाले आहे. त्यामुळे अनेक सुहासिनीनी वटपौर्णिमेला घरात वडाच्या फांद्याच पूजन करतात. मात्र वडाच्या झाडाला कोणतीही इजा न करता, वटपौर्णिमा आनंद लुटण्याचा संकल्प अनेक महिलांनी केला आहे. वडाच्या फांदीसाठी वडाच्या झाडांना मोठी हानी पोहचत असून, वडाच्या संवर्धनासाठी अनेक सुहासिनी वडाची प्रतिकात्मक चित्र काढून पूजन करणार आहेत.
वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या कापून, पूजा झाली की दुसऱ्या दिवशी फांदी कचराकुंडीत फेकली जाते. मात्र वडाची फांदी कुंडीत लावल्यावर जगते. त्यामुळे घरात पुजलेली फांदी नंतर धारधार सुरीने खालच्या बाजूने आडवा छेद कापून, कुंडीत लाऊन, काही महिन्यांनी सुरक्षित ठिकाणी वृक्षरोपण करावे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची मोठी मदत मिळते. यातही वड पिंपळ उंबर कडूलिंब आदी अनेक स्थानिक झाडे महत्वाची असतात. आयुर्वेदात वडाचे झाड खूप महत्त्वाचे आहे. भरपूर प्राणवायू देवून व धुलिकण शोषून घेतात. – डॉ. प्रमोद साळसकर (ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ)
ठाणे शहरात पूर्वी वड पिंपळ उंबर अशा झाडांची मांदियाळी होती. घराबाहेर पडले की जवळच वडाचे झाड असल्याने, वटपौर्णिमेला सुहासिनींना वडाचे झाड शोधावे लागत नव्हते. मात्र ठाण्यात आता वडाचे झाड शोधावे लागते. झाडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करणे मला आवडत नाही. त्यामुळे वडाचे चित्र कागदावर काढून प्रतिकात्मक पूजा करेन. – सौ. संपदा टेंबे (ठाणे पूर्व)