विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सी चालकांमध्ये घबराट
नवी मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अनधिकृतरीत्या आणि बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने देखील आपल्या हद्दीतील होर्डिंग काढून टाकण्याची तसेच बेकायदेशीररीत्या विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने सायन-पनवेल महामार्गालगत वाशी गाव येथे विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विनापरवानगी होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात एजन्सी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईमध्ये १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पेट्रोल पंपावर असलेले भलेमोठे होर्डिंगग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७४ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर अनधिकृतपणे तसेच विनापरवानगी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकाने आपल्या हद्दीत अनधिकृतरीत्या आणि विनापरवानगी उभारण्यात आलेल्या सर्व होर्डिंगची झाडाझडती सुरू केली आहे. वाशी विभागाच्या हद्दीत सायन-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी गांव येथे घर क्र. ३ ते १५ आणि १५ ते १७ तसेच १८ ते २० या घरांवर बेकायदेशीररीत्या विनापरवानगी भले मोठे होर्डिंग उभारण्यात आल्याचे वाशी विभाग कार्यालयाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे वाशी विभाग कार्यालयाने सदरचे होर्डिंग उभारणाऱ्या मे. तिरुपती अॅडव्हर्टायझिंगचे चालक-मालक बिपीन मेहता यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विनापरवानगी जाहिरातबाजी करून शहर विद्रुप करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या होर्डिंगवर कारवाई
सायन-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी गाव येथे विनापरवानगी उभारण्यात आलेले जाहिरातीचे होर्डिंग (बिल बोर्ड) वाहतुकीस अडथळे निर्माण करत असल्याने, वाहन चालकांचे लक्ष विचलित करत होते. सदरचे होर्डिंग अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे आणि शहर विद्रुपीकरणास देखील हातभार लावत असल्याने सदर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याबाबत ‘सार्वजनिक बांधकाम विभाग’ने नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचित केले होते.
शासन नियमानुसार नागरी आणि औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या मध्यापासून ६० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून १५ मीटर यापैकी जास्त असेल, अशा अंतरावर होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. मात्र नवी मुंबई महापालिका हद्दीत सायन-पनवेल मार्गालगत उभारण्यात आलेले अनेक होर्डिंग रस्त्याला खेटून तसेच रस्त्यालगत असलेल्या इमारतींवर बिनदिक्कतपणे अनधिकृतरीत्या उभारण्यात आल्याचे दिसून आले आहे. मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, कलम-३ अन्वये नियमबाह्य आहे. सदर कलमान्वये द्रुतगती मार्गाची हद्द, इमारत रेषा आणि नियंत्रण रेषेच्या आत कोणतीही कार्यवाही करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.