विश्व हिंदू परिषदेने पोलिसांना दिली होती सूचना
कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
भाईंदर : मीरा रोडच्या नया नगर भागात विक्रीसाठी आलेल्या गोमांसच्या चार गाड्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या. दरम्यान गाड्यांचा पाठलाग करणाऱ्या कार्यकर्त्याला चालकांनी मारहाण केल्याने, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करून गाडी चालक आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
विश्व हिंदू परिषद भाईंदर जिल्हा महामंत्री नागनाथ कांबळे यांनी १५ जून रोजी पोलिसांना पत्र पाठवून कळविले होते की, नया नगर भागात ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्रीसाठी येण्याची शक्यता असून ते पकीजा बीफ शॉफ येथे उतरविण्याची शक्यता आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारे पत्र देऊनही विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दक्ष होते. त्यांनी सर्वत्र पाळत ठेवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गोमांस असलेले तीन टेम्पो आणि एक ट्रक येताच त्यांनी पाठलाग केला आणि कासम कुरेशी यांच्या पकीजा बीफ शॉफ येथे उतरविण्याच्या आधीच पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडले. दरम्यान गाडी चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या नरेश निले या कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते भडकले होते.
मांस असलेल्या चार गाड्या पकडल्या असून, त्यातील मांस कशाचे आहे, हे तपासणीसाठी पाठविले आहे. तीन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण पळून गेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गाड्या कुठून आल्या होत्या, कोणासाठी आल्या होत्या, ते तपासात स्पष्ट होईल, असे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.