Wednesday, October 9, 2024
HomeमहामुंबईPandavkada Falls : पांडवकडाच्या पायथ्याशी फुलली वनराई!

Pandavkada Falls : पांडवकडाच्या पायथ्याशी फुलली वनराई!

‘विभात्मके देवे’ पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांना यश

झाडांमुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ

नवी मुंबई : साधक मंडळी सदस्यांनी खारघरमधील (Kharghar) पांडवकडा (Pandavkada Falls) डोंगराच्या पायथ्याशी केलेल्या रोप लागवडीमुळे पांडवकडा परिसरात वनराई पसरली आहे. झाडांवरील पेरू, काजू आदी फळे पक्ष्यांचे खाद्य झाले असून, फुललेल्या वनराईमुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.

५ जून या जागतिक पर्यावरण दिनी वृक्षप्रेमी रोप लागवड करून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करतात. मात्र खारघरमधील विश्वात्मके देवे साधक मंडळीमधील पर्यावरणप्रेमी खारघर पांडवकडा डोंगराच्या पायथ्याशी आंबा, काजू, पेरु, चिंच, वड, जांभूळ आदी विविध वृक्षरोपांची लागवड करून, गेल्या पंधरा वर्षांपासून लावलेल्या रोपांचे संवर्धन करीत असल्यामुळे, पांडवकडा डोंगराच्या पायथ्याशी वनराई बहरली आहे.

खारघर डोंगर पूर्वी खारघर गावाचे वैभव म्हणून ओळखला जात होता. हिरवाईने नटलेल्या खारघर डोंगरात पूर्वी आंबा, फणस, करवंद, जांभूळ आदी फळांचा आस्वाद ग्रामस्थ घेत होते. तसेच पक्ष्यांची किलबिल, विविध फुलांच्या झाडांचा गंध दरवळत होता. पांडवकडा धबधबा डोंगर परिसरात १० हजारांपेक्षा अधिक जांभूळ, पिंपळ, वड, फणस, आंबा, कडूनिंब, बाभूळ, चिंच, अर्जुन आदी विविध जातीच्या देशी झाडांची रोप लागवड करून, या झाडांना पांडवकडा धबधबालगत असलेल्या ओढ्यात मोटार पंप लावून पाणी दिले असल्यामुळे, खारघर डोंगरावर लावण्यात आलेली झाडे १० ते १५ फुटापर्यंत मोठी झाली आहेत.

विश्वात्मके देवे साधक मंडळी सदस्यांनी लागवड केलेल्या पेरु, काजू या झाडांना फळे येत असल्यामुळे, या फळांचा आस्वाद पक्षी घेत आहेत. खारघर डोंगर परिसर हिरवागार दिसत झाल्यामुळे, या डोंगरावर येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शक पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मके देवेसाधक मंडळी सदस्य दादासाहेब मोटे, डॉ. सुभाष सावंत, दादासाहेब दहीगंडे, डॉ. विजय नलावडे आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.

झाडे पक्ष्यांना अन्न देतात, झाडावर असलेली काही कीटके पक्ष्यांचे अन्न बनतात, तर काही पक्षी झाडावर घरटी बांधतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून वाढत्या तापमानाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रोप लागवड करणे आवश्यक आहे. येत्या पावसाळ्यात पांडवकडा डोंगरावर एक हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे, असे विश्वात्मके देवे साधक मंडळाचे सदस्य डॉ. विजय नलावडे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -