महाराष्ट्रातील पराभवानंतर दिल्लीतील नेत्यांनी केल्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. देशात अब की बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपाचे दोन्ही विजयाचे स्वप्न भंगले. मात्र, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. पण, भाजपाला अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्याने दिल्लीकरांनीही या पराभवाची कारणमिमांसा सुरू केली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या, अशा सूचनाच दिल्लीतील नेत्यांनी केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची विनंती केली होती. मात्र, भाजपाच्या वरिष्ठांनी त्यांना कायम राहण्याच्या सूचना करत, काम सुरुच ठेवा, असे सांगितले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबवायचो असेल, तर भाजपाने एकत्रितपणे काम करायला हवे. महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्वच जुन्या नेत्यांनी सक्रीय करायला हवे,’ अशा शब्दांत दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजपा नेतृत्वाची शाळा घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, आत्तापासूनच उमेदवारांना तयारी सुरू ठेवायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणायची आहे, अशाही सूचना भाजपच्या वरिष्ठांनी कोअर कमिटीला केल्या आहेत.
सोशल मीडियातून विरोधकांना प्रत्युत्तर द्या
महाराष्ट्र भाजपाच्या सोशल मीडियावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती आहे. सोशल मीडियात भाजपाविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याचे मत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेले आहेत, त्याला उत्तर देण्यात भाजपाचे राज्यातील नेते कमी का पडले?, अशी विचारणा दिल्लीश्वरांनी भाजपाच्या राज्यातील नेत्यांना केली आहे.
विधानसभा निवडणुकीत तरी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करा, अशा सूचनाही राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीकडून जो नेरेटीव्ह सेट करण्यात आला, त्याला सोशल मीडियातून प्रभावीपणे उत्तर देण्यात कमी पडल्याची जाणीवही भाजपा नेत्यांना करुन देण्यात आली आहे.
विधानसभेच्या रोडमॅपवर बैठकीत चर्चा
येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत पुढे कसे जाता येईल? या संदर्भातली सगळी कार्यवाही ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.