Tuesday, July 1, 2025

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभाग रुंदीकरणाच्या कामाची पूर्तता

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभाग रुंदीकरणाच्या कामाची पूर्तता

लोणेरे येथील पूल व वडपाले रस्त्याची कामे लवकरच लागणार मार्गी


महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मागील तीन वर्षांपासून सुरू रुंदीकरणाच्या कामाची पूर्तता महाड उपविभागात जवळपास पूर्ण झाली असून लोणेरे येथील उड्डाणपुलाचे व वडपाले येथील रस्त्याचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोल महाडकर यांनी दिली आहे.


महाड उपविभागात टेमपाले ते धामणदेवी पर्यंत एकूण ३९ किलोमीटर लांबीच्या मार्गाची निर्मिती लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून करण्यात आली . यामध्ये दोन मोठ्या पूलांसह अकरा लहान पूलांचा समावेश आहे. महाड उपविभागातील या कामासाठी सुमारे ६५० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती श्री अमोल महाडकर यांनी देऊन या दरम्यान प्रलंबित असलेल्या वनखात्याकडून जमिनी संदर्भातील परवानगीची कामे पूर्ण झाल्याने दासगाव साहिल नगर परिसरात राहिलेली संबंधित कामे पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या मार्गावरील वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाला सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असल्याची माहिती दिली, तसेच यासंदर्भात वनखात्यामार्फत मार्गांवर वृक्षारोपणाची कामे सुरू झाली असून खड्डे मारण्यास प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले.


शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्गावर वड, पिंपळ, आंबा, जांभूळ,यासारख्या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगून या संदर्भात वनखात्याकडे ही संपूर्ण जबाबदारी दिल्याची माहिती दिली. एकूणच मागील सात दशकांपेक्षा जास्त काळापासून कोकणातील जनतेची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी हजारो नागरिकांच्या झालेल्या आंदोलना पश्चात मागील तीन वर्षापासून सुरू होऊन ती आता जवळपास पूर्णत्वास गेली आहे. मागणीची पूर्तता झाल्याने परिसरातील नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग संबंधित मंत्री नितीन गडकरी व बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय अधिकारी वर्गाला धन्यवाद देण्यात येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >