ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
राजगीर (वृत्तसंस्था) : नालंदा हे फक्त एक नाव नाही. ती एक ओळख आणि आदराचे ठिकाण आहे. नालंदा एक मूल्य आणि मंत्र आहे. केवळ भारताचाच नाही तर जगातील अनेक देशांचा वारसा नालंदाशी जोडला गेला आहे. नालंदा विद्यापीठाकडून असे शिकता येते की आगीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळतात, पण ज्ञान मात्र कायम अबाधित राहत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशच्या वाराणसीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी बिहारच्या दौऱ्यावर पोहोचले. पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच बिहारला भेट देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारच्या राजगीर मधील ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही होते.
सकाळी नालंदा विद्यापीठात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या ऐतिहासिक वारशाची पाहणी केली. जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पाटणा सर्कल प्रमुख गौतमी भट्टाचार्य यांच्याकडून माहिती घेतली. १६०० वर्षे जुन्या नालंदा विद्यापीठाला अखेर नवे रूप मिळाले आहे.
नालंदा विद्यापीठात पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर संदेश पोस्ट करून संदेश दिला होता. त्यांनी लिहिले की, ‘आमच्या शिक्षण क्षेत्रासाठी हा खूप खास दिवस आहे. नालंदाचा आपल्या गौरवशाली भूतकाळाशी खोल संबंध आहे. तरुणांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच पुढे जाईल.’
‘तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांतच मला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली. ही बाब मी भारताच्या विकासाच्या प्रवासाचे एक शुभ चिन्ह म्हणून मानतो. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. नालंदा हे एक असे सत्य आहे जे स्पष्टपणे सांगते की, अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत. हे नवीन कॅम्पस भारताची नवी क्षमता जगाला दाखवेल. नालंदा दाखवून देईल की जी राष्ट्रे भक्कम मानवी मूल्यांवर आधारित असतात, त्यांना इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया घालणे जमते,’ असे मोदी म्हणाले.
प्राचीन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाणार
‘नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाशीच निगडीत नाही, तर जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा त्याच्याशी निगडीत आहे. आमच्या भागीदार देशांनीही नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बांधणीत सहभाग घेतला आहे. या निमित्ताने मी भारताच्या सर्व मित्र देशांचेही अभिनंदन करतो. प्राचीन नालंदामध्ये मुलांचा प्रवेश त्यांच्या ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केला जात नव्हता. प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण इथे यायचे. नालंदा विद्यापीठाच्या या नव्या कॅम्पसमध्ये पुन्हा तीच प्राचीन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. ‘वसुधैव कुटुंबकम्’ याचे नालंदा हे सुंदर प्रतीक आहे,’ असेही मोदींनी अभिमानाने सांगितले.
१७ देशांचे विदेशी राजदूतांची उपस्थिती
या उद्धाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम यासह एकूण १७ देशांचे विदेशी राजदूतही उपस्थित होते.
नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे वैशिष्ट्य
नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ विद्यापीठाचा नवीन परिसर बांधण्यात आला आहे. यात २ शैक्षणिक विभाग असून ४० वर्गखोल्या आहेत. येथे १,९०० मुलांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. विद्यापीठात प्रत्येकी ३०० लोकांची क्षमता असलेली २ सभागृहे आहेत. याशिवाय हजारो लोकांची क्षमता असलेलं इंटरनॅशनल सेंटर आणि ॲम्फी थिएटरही बांधण्यात आले आहे. सुमारे ४५५ एकर परिसरात पसरलेल्या नवीन कॅम्पसमध्ये १७५० कोटी रुपये खर्चून नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत.