भाजपाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यात होणार सहभागी
नागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी यात सहभागी होतील. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ, त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत, असे माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले की, मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली, हे माझे भाग्य आहे, शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले, शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही सत्ताबदल करू, असे विधान केले. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली असेल. पण तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदी यांना काय काय बोलत आहात. महाराष्ट्राच्या जनतेनेही त्याची नोंद घेतली आहे. आज यशाने ते थोडे हुरळून गेले आहेत. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
शरद पवार यांनी या गोष्टीचे आकलन केले पाहिजे. विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आल्यानंतर महायुतीत सविस्तर चर्चा करतील. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही. याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.