Tuesday, April 22, 2025
HomeमहामुंबईKarnala Fort : कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार

Karnala Fort : कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार

भुयाराचे मातीने बुजलेले तोंड अडीच फूट लांब व दीड फुट रुंद

पनवेल : पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर (Karnala Fort) प्राचीन भुयार (गुहा)आढळली. गडकिल्ल्यांचे अभ्यासक व सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुवीर व सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांच्या पाहणीत हे भुयार निदर्शनास आले. याबाबतची माहिती गणेश रघुवीर यांनी वन विभाग व पुरातत्व विभागाला दिली. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्यावर ही प्राचीन भुयार/गुंफा आढळली. यामुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा समोर आला. यापूर्वी किल्यावर दोन भुयार आहेत. या भुयारांचा वापर पूर्वी वाटसरू थांबण्यासाठी किंवा ध्यानधारणेसाठी करत असल्याचा अंदाज दुर्ग अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

कर्नाळा किल्याचे संरक्षण व जतनासाठी वनविभागाने इतिहास अभ्यासकांची एक समिती स्थापन केली. गणेश रघुवीर हे त्या समितीचे एक सदस्य आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये गणेश यांच्या अभ्यासगटाने कर्नाळा किल्यावरील निसरड्या वाटा, किल्याचा कोणता भाग ढासळतोय त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा विस्तृत अहवाल बनवून दिला होता. त्यानंतर वन विभागाला निधी मिळाल्यानंतर वन विभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी गणेश रघुवीर व मयूर टकले यांना किल्यावर नवे भुयार आढळले. हे भुयार पूर्वीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या भुयारापुढे ८० फुटावर कातळाच्या कडेला आढळले. हे भुयार ८०% मातीने बुजले असून याचे तोंड अडीच फुट लांब व दीड फुट रुंदीचे आहे. भुयाराची आतील बाजू सुमारे १० फुट एवढी आहे. मातीचा गाळ काढल्यानंतर त्याची प्रत्यक्षात मोजमाप काढता येईल असे गणेश रघुवीर म्हणाले.

किल्ल्याच्या घेऱ्यात असलेल्या पायथ्या जवळील कल्हे गावातून अर्धातास उंचीवरील कड्यात एक कोरीव भुयार आहे तर किल्यावर एल आकारची दोन कोरीव भुयारे आहेत. त्यांना स्थानिक पाण्याची टाके असे म्हणतात. परंतू ही पाण्याची टाके नसून ही भुयार वाटसरुंना विसावा किंवा ध्यानधारणांची ठिकाणे असल्याचे रघुवीर यांनी स्पष्ट केले. भुयार क्रमांक १ पहिल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक पायवाट जाते त्याने दोन मिनिटे चालत गेले, असता कातळात खोदलेले कोरीव भुयार दिसते. हे एल आकाराचे आहे. याचे तोंड ३X३ एवढे असून ६ फुट खोल व तळाशी ३X३ आकारचे तोंड असून ते १० फुट लांबीचे कोरलेले आहे. भुयार क्रमांक २ किल्ल्यावरील कर्णाई देवी मंदिरा समोर पत्राच्या शेडच्या उजव्या बाजूला एक मोठा घराच्या जोत्याचा चौथरा आहे. त्यावरून डाव्या बाजूने कडे कडेने गेले असता तेथे कातळात खोदलेले एक भुयार आहे. त्याचे तोंड हे २.५ X२.५ आकाराचा चौकोनी भाग असून हा साधारण ६.३ फुट एवढा खोल असून त्याच्या तळाशी २ X२ फुट आकाराचा चोकोनी भाग कोरला असून आत ८ ते १० फुट लांब एवढा कोरीव भाग आहे.

किल्यावरील इतर भुयारे किल्ल्याच्या प्राचीन कालखंडातील दुर्ग अवशेषांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. यावरून किल्ल्याची निर्मिती ही प्राचीन कालखंडात झालेली आढळते.प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील स्थापत्याच्या खुणा आजही कर्नाळा किल्यावर दिसतात. डोंगराचे कडे तासून त्यावर केलेले बांधकाम, खडकात खोदलेल्या मोठ्या प्रमाणातील टाके, कोठारे, वाड्याची इमारत, घरांची जोती, चौकी मेट, शरभ शिल्पांचे नमुणे येथे पाहायला मिळतात. येथील शिलालेख हे किल्ल्यावरील बांधकाम व त्याकाळातील राजवटीची माहिती देतात. या किल्ल्यावर सातवाहन,पोर्तुगीज, गुजरात सुलतान, देवगिरी यादव, आदिलशहा,निजामशहा,मराठे आणि इंग्रज या राजवटी इथे होऊन गेल्याचे अनेक संदर्भ येथे मिळतात.आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव सुद्धा या किल्ल्यावर होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -