Tuesday, July 1, 2025

Water Crisis : दिल्लीत पाणीबाणी! पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

Water Crisis : दिल्लीत पाणीबाणी! पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असली तरीही देशातील अनेक राज्यातील नागरिकांना अजूनही उष्णतेच्या लाटा (Heat Wave) सोसाव्या लागत आहेत. एकीकडे प्रचंड उकाड्यामुळे काहिली होत असताना दुसरीकडे भीषण पाणीटंचाईला (Water shortage) सामोरे जावे लागत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथेही नागरिकांना अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील गीता कॉलनी, वसंत विहार, ओखला अशा अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. या भागातील जलसंकटामुळे स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. या विभागात टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. दिल्लीतील स्थानिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे वसंत विहार परिसरातील कुसुमपूर पहाडी येथील लोकांनाही पाणी संकटाचा सामना करावा लागत असून ते टँकरवर अवलंबून दिवस काढत आहेत.


दरम्यान, पाणीटंचाई क्षेत्राजवळ टँकर येताच नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडत आहे. पाऊस पडल्यानंतर पाणीटंचाईची परिस्थिती सुधारु शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हामुळे हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment