Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

NEET-UG 2024 : ०.००१% निष्काळजीपणा असेल तरी देखील त्यावर कारवाई करावी!

NEET-UG 2024 : ०.००१% निष्काळजीपणा असेल तरी देखील त्यावर कारवाई करावी!

नीट परिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट २०२४ (NEET-UG 2024) परिक्षेचा निकाल काही दिवसांपासून वादाच्या रिंगणात सापडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परिक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) पोहोचला असून आज याबाबत सुनावणी पार पडली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार (Central Government) आणि एनटीएला (NTA) एक नोटीस बजावली असून त्यावर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले, NEET परीक्षेत ०.००१% निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. उमेदवारांनी केलेले प्रचंड श्रम लक्षात घेऊन सर्व गांभीर्याने पाहावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

केंद्र सरकार आणि एनटीएचे प्रतिनिधीत्व करणारे अधिवक्ता कानू अग्रवाल आणि वर्धमान कौशिक यांना संबोधित करताना न्यायमूर्ती भट्टी यांनी सांगितले की, "जरी कोणाकडून ०.००१% निष्काळजीपणा असला तरीही, त्यास पूर्णपणे हाताळले पाहिजे. या सर्व बाबींना विरोधी खटला म्हणून हाताळले जाऊ नये."

पुढे ते म्हणाले, परिक्षेत फसवणूक करून डॉक्टर बनणारा उमेदवार समाजासाठी अधिक धोकादायक आहे. या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेसाठी उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल न्यायाधीश जागरूक असतात. "अशा परिस्थितीची कल्पना करा की ज्या व्यक्तीने सिस्टीमवर फसवणूक केली आहे, तो डॉक्टर झाला आहे, तो समाजासाठी अधिक हानिकारक आहे. विशेषत: या परीक्षांच्या तयारीसाठी मुलांना किती कष्ट करावे लागतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे." न्यायमूर्ती भट्टी यांनी टिपणी केली.

Comments
Add Comment