महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हाताने उकरुन दाखवला
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे महिन्याभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या रस्त्याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याची बांधणी निकृष्ट दर्जाची (Poor quality road construction) असल्याचा आरोप नागरिकांनी केला. इतकंच नव्हे तर रस्त्यातील माती कोणत्याही साधनाशिवाय त्यांनी हाताने उकरुन दाखवली.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी-तुळजापूर उपळे दुमाला गावातील नागरिक या गोष्टीमुळे संतप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
बार्शीतील स्थानिक रहिवासी सचिन नाईकवाडी यांनी सांगितले की, ‘रस्त्याची अवस्था ही अशी झाली आहे आणि कंत्राटदार पैसे घेऊन निवांत बसले आहेत. पहिल्यापासून रस्ता खराबच झाला आहे, काम होऊन अजून दीड महिना देखील पूर्ण झालेला नाही’. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करुन द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.