Saturday, June 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAshadhi Wari : आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी!

Ashadhi Wari : आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी!

आषाढी वारीनिमित्त ‘आपला दवाखाना’ वारकऱ्यांच्या सेवेत

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi Wari) राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही ‘आपला दवाखाना’ (Health Department) वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी वारीनिमित्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने पाच किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणीही अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत.

वारकऱ्यांच्या आरोग्याची पुरेपूर दक्षता

पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर अत्यवस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे ८७ अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय, १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सज्ज असणार आहेत. दिंडी प्रमुखांसाठी ५ हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत.

त्याचबरोबर पालखी मार्गावरील दोन हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यासोबत सात हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, ढाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत.

आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत

वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा अशा तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे.

महाआरोग्य शिबिरासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त

वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवली जातात. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने तीन हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -