Wednesday, July 24, 2024
Homeक्राईमNagpur Hit and run : नागपुरात मद्यधुंद तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना...

Nagpur Hit and run : नागपुरात मद्यधुंद तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं!

हिट अँड रन प्रकरणाने उडाली खळबळ

नागपूर : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ‘हिट अँड रन’च्या (Hit and Run) अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघाताने (Pune Porsche car accident) तर अख्ख्या राज्याचं वातावरण तापलं होतं. हे प्रकरण शांत झालेलं नसतानाच आणखी नवीन प्रकरणं राज्यभरातून उघडकीस येत आहेत. त्यातच नागपुरातही झालेल्या एका ‘हिट अँड रन’ (Nagpur Hit and run case) प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सात तरुणांच्या एका गाडीने नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या नऊ मजुरांना चिरडले. यांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ काल रात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली व यात २ मजुरांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.

सात मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून सध्या पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोण होते हे नशेखोर तरुण?

सदर हिट अँड रन प्रकरणात अपघातग्रस्त कारमध्ये भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे, आणि ऋषिकेष चौबे हे सात मित्र होते. हे सातही मात्र वंश झाडे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर पार्टी करायला गेले. दरम्यान, कार ही सौरभ कडुकरच्या मालकीची असून पार्टी केल्यानंतर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व २० ते २२ वयोगटातील तरुण असून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असतानाही त्यांनी नागपूरचा आऊटर रिंग रोड फिरायचा बेत आखला आणि गाडी दिघोरी रोड मार्गे नेण्याचे ठरवले. काल रात्री १२ वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त भागात एक विवाह सोहळा सुरु होता. त्यामुळे तेथे थोडी गर्दी आणि वाहनांची रेलचेल होती. त्याच दरम्यान ही घटना घडली.

आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. या घटनेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -