Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीLaxman Hake : सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय उपचार घेणार नाही!

Laxman Hake : सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय उपचार घेणार नाही!

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची मागणी

जालना : ओबीसी समाजाच्या आरक्षणात (OBC Reservation) मराठा समाजाचा (Maratha Samaj) समावेश करु नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) व नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जालन्यातील अंतरवाली सराटीच्या (Antarwali sarati) वेशीवरच हे उपोषण सुरु आहे. सरकार मनोज जरांगे पाटील (Manoj Jaraneg Patil) यांच्या उपोषणाची दखल घेतं मात्र आमची घेत नाही, असा आरोप हाके यांनी केला होता. यानंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज हाके व वाघमारे यांच्या भेटीसाठी दाखल झालं. यावेळी ‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपचार घेणार नाही’, असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सुरु केलेलं उपोषण सहाव्या दिवशी मागे घेत सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक झाला असून ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करु नये ही मागणी त्यांनी उचलून धरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आज जालन्यात उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या.

अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषण करण्याचं कारण काय?

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींची अनेक आंदोलने झाली. सावित्रीमाई फुलेंच्या जन्मगावीही आंदोलन केलं. त्यावेळी सरकारच्या स्थानिक प्रतिनिधीनेही या आंदोलनाची दखल घेतली नाही. चौंडी आणि भगवानगडाजवळही ओबीसींनी आंदोलन केलं. त्याचीही सरकारने दखल घेतली नाही. हे सरकार ओबीसींचं नाही का? आमची लोकसंख्या ६० टक्के आहे. तरीही आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. सरकार फक्त ठरावीक लोकांचं आणि वर्गाचं आहे काय? लोकप्रतिनिधी असं करत असतील तर जायचं कुठे? म्हणून अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीत आंदोलन सुरू केलं आहे, असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं.

‘तुम्ही ओबीसींचे मित्र कसे?’ जरांगेंना केला सवाल

मनोज जरांगे गेल्या सात आठ महिन्यापासून सांगत आहेत की ओबीसी आमचे बंधू आहेत. ओबीसी बांधवांच्या वाहनात पेट्रोल टाकून आम्ही प्रवास करतो. आमच्यात भाईचारा आहे. असं असेल तर मनोज जरांगे ओबीसी नेत्यांवर टीका का करतात? ओबीसी नेत्यांना टार्गेट का करतात? बलुतेदार आणि आलुतेदारांचे हक्क का हिरावून घेत आहेत? त्याच्या पालात तुम्ही का घुसत आहात? मग तुम्ही ओबीसींचे मित्र कसे असू शकता?, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली

लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने सकाळी दोन्ही उपोषणकर्त्यांची तपासणी केली. यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बिराजदार यांनी दिली.

काय आहेत ओबीसींच्या मागण्या?

ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयांकडून मिळाले पाहिजे.
कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.
ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी.
ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी.
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.

यावर आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -