विधानसभेच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांना सूचना
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात काही प्रमाणात फटका बसला. याची आता विधानसभेत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीकडून पुर्पूर काळजी घेतली जात आहे. तसेच विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या दृष्टीने रणनिती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधन केले. भाजपच्या ‘चारसो पार’च्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची स्पष्ट कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच विधानसभेत मात्र आता अशा प्रकारे गाफील राहायचं नाही, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही गाफील राहू नका. आपण सर्व कार्यकर्ते आहात, एक-एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझ्या एका मताने काय होणार, आपण जिंकणारच आहोत, असा विचार करुन गाफील राहता कामा नये. आम्ही पंतप्रधान मोदीजींसोबत (PM Modi) 400 पारच्या घोषणेबाबत बोललो. या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले, असे मी त्यांना सांगितले. पण आता तसं करायचं नाही. आपले मोदीजी पंतप्रधानपदी बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणी कितीही जंग जंग पछाडले तरी मोदीजी त्यांच्यावर भारी पडतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात आपण जिंकलो आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना चिंता नाही, विजय आपलाच आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक मनावर घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे, भिवंडी अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवले, त्यामध्ये ते यशस्वी ठरले. फेक नरेटिव्ह पसरवण्यात काही स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) हात होता. सगळ्याच स्वयंसेवी संस्था वाईट नाहीत. पण काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शहरी नक्षली घुसले आहेत. हे सर्वजण मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. या एनजीओंनी देखील मोदी हटावचा नारा दिला होता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी मतांची टक्केवारीतील फरक फार कमी आहे. आज मुंबईतही आपल्याला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत. आज आपला स्ट्राईक रेट उबाठा पेक्षा जास्त आहे. राज्यातील मतांच्या टक्केवारीत आपण थोड्या फरकानेच मागे आहोत. लोकसभा निवडणुकीत ३० जागांवर विजय मिळाल्यानंतर आम्ही १८० जागा जिंकणार, असे मविआ म्हणत आहे. असे गणित कुठे असते का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला.