Saturday, July 5, 2025

Murud news : मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझेरयन शस्त्रक्रिया सुविधा

Murud news : मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझेरयन शस्त्रक्रिया सुविधा

आदिवासी गरोदर महिलांची होणारी गैरसोय टळली


मुरुड : दुर्गम ग्रामीण भागातील गरजू गरीब व आदिवासी गरोदर महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिझेरियन शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मंगेश पाटील, भूलतज्ञ डॉ. तुषार राजपूत यांचे सहकार्य या रुग्णालयास लाभले असून आत्तापर्यंत ३ सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत.


जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड यांच्यामार्फत प्रसूती कक्ष अत्याधुनिक करण्यात आलेला आहे. याचा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी व सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . अंबादास देवमाने मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आला होता.

या सुविधेबरोबरच गरोदर मातांना जाण्या-येण्यासाठी १०२ रुग्णवाहिका सेवा, मातांच्या दैनंदिन तपासण्या, लसीकरण, औषधोपचार, मोफत आहार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मातांची मोफत सोनोग्राफी यासारख्या सुविधा रुग्णालयात दिल्या जातात. त्यामुळे सदरच्या अत्याधुनिक प्रसुती कक्ष व इतर सोयी सुविधांचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी केले आहे.

Comments
Add Comment