
मुंबई: बांगलादेश संघाने दमदार कामगिरी करताना नेपाळला २१ धावांनी हरवले आहे. या विजयासह टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये स्थान मिळवले आहे. बांगलादेशने सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला केवळ ८५ धावाच करता आल्या. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तंजीम हसन शाकिबने ४ विकेट मिळवल्या. नेपाळसाठी कुशल मल्लाने २७ धावा केल्या.
बांगलादेशने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाने १९.२ षटकांत ८५ धावा केल्या, नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र फलंदाज काही खास करू शकले नाहीत. कुशल मल्लाने ४० बॉलमध्ये २७ धावा केल्या. दीपेंद्र सिंहने ३१ बॉलमध्ये २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार लगावले.
बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान शाकिबने २२ बॉलचा सामना करताना १७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार लगावले. लिटन दास १० धावा करून बाद झाला. तंजिम हसन केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जाकिर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसैन शंटो केवळ ४ धावा करून बाद झाला.
सुपर८मध्ये प्रवेश
बांगलादेशने नेपाळला हरवत सुपर८मध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत त्यापैकी ३मध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभव पाहावा लागला. बांगलादेशचे सहा गुण आहेत.