हलकं-फुलकं – राजश्री वटे
हा छंद जीवाला लावी पिसे…
कुठल्याही छंदाची प्रत्येकालाच एक नशा असते… जबरदस्त!! ती नशा गारूड करून असते… या नशेलाच झिंग येणं म्हणतात आणि जेव्हा हा छंद पराकोटीला जातो तेव्हा जी झिंग चढते ना… ती झिंग…. झिंग झिंग झिंगाट होऊन जाते!!
चित्रकाराला चित्र काढण्याची, त्यात रंग भरण्याची कला असते, त्यामुळे त्या चित्रांमध्ये जिवंतपणा भासतो… इतकं जीव ओतून केलेली कला असते ती! जोपर्यंत हे चित्रकाराला साध्य होत नाही तोपर्यंत त्याला एक झिंग चढलेली असते आणि त्यामुळे ते चित्र परफेक्ट बनतं आणि बनायलाच पाहिजे!!
तसेच दगडातून मूर्ती साकारणारे, लाकडापासून अनेक नक्षीदार कलाकृती साकारणारे हात म्हणजे दैवी देणगीच! गायक जेव्हा मैफलीत गाणं गातो… प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो… ही एक दाद असते रसिकपणाची… त्यांच्या छंदीपणाची झिंग असते…
यात गाणारा व ऐकणारा… दोघांनाही त्या मैफलीची जबरदस्त झिंग चढते… त्या नशेत एक-दोन दिवस तरंगतच असते व्यक्ती… हे फक्त गाण्याच्या अस्सल दर्दी असणाऱ्यांमध्ये हमखास दिसणार! गायकाला साथ देणारे वादक… विशेषत: तबला… त्या सुंदर गाण्याची नशा तबला वाजवणाऱ्याच्या बोटांना चढलेली दिसते… काय वाजवतो…
क… मा… ल…
ही पण एक झिंगच ना!!
तबल्याची साथीदार ढोलकी आठवली… तिला जेव्हा घुंगरांची साथ मिळते… वा… वा… काय जुगलबंदी रंगते… जबरी!!
कथक असो… लावणी असो किंवा नृत्याचा कुठलाही अाविष्कार असो… कान, डोळे, मन तृप्त होऊन जातात…
मंदिरातील भजन असू दे नाही तर कीर्तन असू दे… टाळाच्या, चिपळ्यांच्या गजरामध्ये भक्तीची झिंग आणतेच… पंढरपूरच्या वारीतील पावलांचा लयबद्ध ठेका… भक्तिरसामध्ये मन आकंठ भारावून जातं. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशाची प्रचंड तालबद्ध लय शरीराची नस अन् नस तरारून उठते… त्यात उत्साह सळसळायला लागतो… आसमंत निनादून उठतो… वातावरणात एक झिंग चढते… तन-मन नाचायला लागते… नुसतं झिंगाट वाटतं बघा!!
कागदाला पाहून लेखणी नादावते… कोऱ्या कागदावर शब्दांचा नाच सुरू होतो… अक्षरांची सुंदर नक्षी तयार होते… अन् त्यातून अर्थपूर्ण, संवेदनशील रचना तयार होऊन वाचणाऱ्यांच्या मनाला भिडतात… ही शब्दांची नशा अन् हीच पुस्तकं वाचण्याची झिंग!!
हाताना सुद्धा डोहाळे असतात कलाकृती साकारण्याचे… रांगोळीच्या एका ठिपक्यापासून सुरू होणारी शिवराज्याभिषेकापर्यंत साकारलेली कला डोळ्यांचे पारणे फेडते… नतमस्तक!!
सुळसुळीत वाळूला हाताची ऊब मिळताच ती पण आकार घेते व एक सुंदर रूप साकार होते… वाळूला काबूत करण्याची हातांची झिंग लाजवाब!!
हा छंद कलाकाराला कुठे नेऊन ठेवतो… कलाकृती साकारण्याची नशा रात्रीचा दिवस करते तेव्हा कुठे एक अप्रतिम कला निर्माण होते. कुठल्याही कामाचं ध्येय असो, कुठलंही क्षेत्र असो, ते मेंदूचा ताबा घेतं… पूर्णत्वाकडे नेईपर्यंत!! अनेक क्षेत्रात असतात असे ध्येयवेडे…
एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी अरुणीमा सिन्हा दोन्ही पाय नसताना ध्येयाने तिला पछाडले होते… त्याची जिद्द तिला एव्हरेस्टच्या टोकावर घेऊन गेली, झेंडा लहरवायला… अनेक प्रकारच्या खेळाडूना ही झिंग कप जिंकण्यापर्यंत पोहोचवते!!
अनेक क्षेत्र…
अशी ही ध्येयपूर्तीची नशा…
झिंग… झिंग… झिंगाट करून सोडते…
मग ध्येय गवसतं!!
मन उचंबळून गायला लागतं…
सैराट झालं जी…