दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील महुआ गावातील रुबी पारीक अवघ्या एक वर्षाची होती. तेव्हा तिचे बाबा कर्करोगाने गेले. रुबी आणि तिच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा आघात होता. उत्पन्नाचं साधन नसल्याने आर्थिक तंगी होती. रुबीला दहावीनंतर शिकायचं होतं मात्र पुढील शिक्षणासाठी जावं लागणारी शाळा लांब होती. कुटुंब पुराणमतवादी असल्याने त्यांची इच्छा नव्हती की, रुबीने हायस्कूल पूर्ण केल्यानंतर अभ्यासासाठी लांब जावे. ग्रामीण भागातील शिरस्त्याप्रमाणे २००३ मध्ये, १९ वर्षांची झाल्यावर दौसाच्या खटवा गावात ओम प्रकाश पारीक यांच्याशी रुबीचं लग्न झाले.
लग्नानंतर तिचे आयुष्य बदलले. तिच्या सासरी कुटुंबाकडे १२.३ एकर शेतजमीन होती. या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करून ते शेती करत असत. कुटुंब शेतीत खूप कष्ट करत होते. पण उत्पन्न जेमतेम उदरनिर्वाहापुरतेच व्हायचे. रसायनांची किंमत, संकरित बियाणे आणि पाण्याची जास्त गरज यामुळे नफा जेमतेम व्हायचा. रुबी शेतीच्या कामात रस घेऊ लागली. तिच्या पतीने तिला आपले अनुभव सांगून शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. २००६ मध्ये, स्थानिक कृषी विज्ञान केंद्रच्या टीमने गावाला भेट दिली आणि गव्हाच्या विविध जातींचे प्रदर्शन केले. रुबी त्या सत्राला उपस्थित राहिली. ‘रासायनिक शेतीला पर्याय आहे का?’ तिने प्रश्न केला. सेंद्रिय शेती हा त्यावरचा उपाय आहे असे तिला कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यांनी तिला सेंद्रिय शेतीच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी येण्यास सांगितले.
मात्र परंपरावादी कुटुंबातील सून असल्याने घराबाहेर पडणे तिच्यासाठी सोपे नव्हते. रुबीच्या पतीने मात्र तिला पाठिंबा दिला आणि प्रशिक्षण सत्रास जाण्यास प्रोत्साहन दिले. रुबी प्रशिक्षणासाठी गेली. प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्यानंतर आणि कुटुंबासह शेतावर काम केल्यानंतर रुबीला काही अनुभव आले. तिने तिच्या सासरच्यांना विनंती केली की, तिला सुमारे १ एकर जमिनीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग करण्याची परवानगी द्यावी. सासऱ्यांनी होकार दिला. रुबीला हुरूप आला. तिने शेतात गवार, मोहरी आणि इतर काही पिके घेतली. पण पहिल्या वर्षी रासायनिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न कमी होते. ते पाहून तिच्या सासरच्यांनी रुबीला सेंद्रिय शेतीपासून दूर राहायला सांगितले. रुबीने वेगळी पद्धत अवलंबली. तिने शेण, गोमूत्र, कडुलिंबाची पाने आणि शेतातल्या पाळापाचोळ्याचा वापर करून सेंद्रिय खत तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वर्षानुवर्षे रासायनिक वापरामुळे नष्ट झालेल्या जमिनीची सुपीकता सुधारली. गांडूळ खत बनवायलाही ती शिकली.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढू लागले. २००८ मध्ये, नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)च्या अधिकाऱ्यांनी तिच्या शेताला भेट दिली आणि तिला गांडूळ खताचे युनिट लावण्यास प्रोत्साहित केले. २०० मेट्रिक टन सुविधा उभारण्यासाठी नाबार्डने रुबीला ५० टक्के अनुदान दिले. त्यावेळी हे राजस्थानमधील सर्वात मोठे गांडूळ खत युनिट होते. हे युनिट टर्निंग पॉइंट ठरले. अनेक महिला सेंद्रिय शेती प्रशिक्षणासाठी रुबीच्या शेतात येऊ लागल्या. रुबी इतरांना सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण देऊ लागली. तिने आतापर्यंत १५,००० हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. सेंद्रिय खताचे हे युनिट दरमहा २०० क्विंटल (२०,००० किलो) गांडूळ खत तयार करते आणि ते रुपये ६ प्रति किलो दराने विकले जाते. म्हणजे महिन्याला १,२०,००० रुपयांची कमाई होते.
रुबीचे पती ओम प्रकाश यांनीही दौसा, सवाई माधोपूर आणि भरतपूरसह सात जिल्ह्यांतील १०० हून अधिक लोकांना गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ते १२५ रुपये प्रति किलो या सरकारी दराने गांडूळ खत विकतात. पण त्याचसोबत अनेक गरजू शेतकऱ्यांना गांडूळ खत, गांडुळे आणि इतर आवश्यक गोष्टी मोफत देतात जेणेकरून ते सेंद्रिय शेतीकडे वळू शकतील. अनुभव आणि प्रशिक्षणातून शिकून, रुबी आता अझोला वनस्पती देखील तयार करते. ही वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे निराकरण करण्याच्या क्षमतेमुळे खत म्हणून वापरले जाते.
गुरांसाठी कोरड्या चाऱ्यात मिसळल्यास दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारते. अझोला ही एक जलचर वनस्पती आहे. जी १० फूट x १० फूट आकाराच्या प्लास्टिक युनिट्समध्ये किंवा खड्ड्यात तयार करता येते. खड्ड्याची खोली एक फूट असते. रुबीकडे पाच अझोलाचे थर आहेत. प्रत्येक खड्ड्यात ते सुपीक माती, काही प्रमाणात शेण आणि ५ किलो अझोलाच्या बिया टाकतात. ते गांडूळ खताच्या थरामध्ये अझोला वनस्पती देखील घालतात. दुधाचे उत्पादन घेणारे पशुखाद्यासाठी ते विकत घेतात. रुबी दर महिन्याला सुमारे ३ क्विंटल (३०० किलो) अझोला विकते. कालांतराने, रुबीच्या कुटुंबालाही सेंद्रिय शेतीचे फायदे दिसू लागले आणि आज त्यांची १२ एकर जमीन पूर्णपणे सेंद्रिय-प्रमाणित आहे. आज त्यांच्या शेतात १०,००० झाडे आहेत. रुबीकडे बियाणे बँक देखील आहे जिथून शेतकरी नाममात्र दरात देशी वाण खरेदी करतात. अधिकाधिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना रुबीने त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे हे सर्वात आव्हानात्मक आहे हे तिला उमजले. या आव्हानातून २०१५ मध्ये, तिने एक शेतकरी उत्पादक संघटना स्थापन केली. या शेतकरी उत्पादक संघटनेचे ५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. रुबी खटवा किसान जैविक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची व्यवस्थापकीय संचालक आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना उत्पादन विकण्यास मदत करते.
शेतकऱ्यांना आता मंडईत जाण्याची गरज नाही. खरेदीदार, बहुतेक स्थानिक सरकारी अधिकारी आणि व्यावसायिक ज्यांना सेंद्रिय अन्नाचे महत्त्व माहीत आहे ते थेट शेतातून खरेदी करतात. शेतकऱ्यांना वाहतूक, वर्गीकरण किंवा प्रतवारीवर कोणताही पैसा खर्च न करता बाजारभावापेक्षा ४० ते ५० टक्के अधिक नफा मिळतो. इतकंच नव्हे तर रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनी आर्थिक सहाय्य देखील पुरवते.‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या धर्तीवर एक महिला शेतकरी सेंद्रिय शेतकरी झाली तर गावाची, जिल्ह्याची पर्यायाने समाजाची प्रगती होते हे रुबी पारीक यांनी सिद्ध केले. कृषी क्षेत्रातील सर्वार्थाने त्या लेडी बॉस आहेत.
[email protected]