Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजफायनान्सरकडून महिलेची फसवणूक

फायनान्सरकडून महिलेची फसवणूक

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी या गरजा भागवण्यासाठी मनुष्याला मेहनत करावीच लागते. त्याशिवाय या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी काही लोक नोकऱ्या, काही लोक व्यवसाय करतात व आपल्या गरजा पूर्ण करतात. पण व्यवसाय करताना त्यासाठी भांडवल लागते. भांडवलीशिवाय कोणताही व्यवसाय सुरू होत नाही. व्यवसायात पहिल्यांदा गुंतवणूक केली जाते आणि मग व्यवसाय सुरू केला जातो.

सरिताने आपला व्यवसाय सुरू करण्याचा ठरवलं. त्यासाठी भांडवलाची गरज होती म्हणून ती एका बँकेत गेली. त्या बँकेतील एक कर्मचारी हा फायनान्स करतो असं तिला समजलं. अनिता नावाच्या फायनान्सरने तिला व्यवस्थित माहिती देऊन आम्ही रकमेवर दहा टक्के व्याज घेतो असं तिला सांगितलं. त्या दोघांमध्ये पैशाची देवाणघेवाण होण्याअगोदर कागदपत्र तयार करण्यात आली. या कागद पत्रामध्ये १० तारखेला व्याज घेतलं जाईल असं नमूद करण्यात आलं होतं.

सरिताने चार लाख रुपये फायनान्सरकडून उचलले आणि दर महिन्याला ती त्याला दहा टक्के प्रमाणे चाळीस ४० रुपये देत होती. तिचा व्यवसाय भरभराटीला येत होता पण व्याजामध्येच ४० हजार रुपये जात होते. घरगुती अडचणीमुळे तिला दोन महिने व्याज देता आले नाही. त्यावेळी मात्र त्या फायनान्सरने तिला सतत फोन करून आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला घरातून बाहेर काढू. तुमचं घर आमच्या नावावर करा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या.

एवढंच नाही तर त्याची बायको रात्री-अपरात्री फोन करून भांडण करू लागली. सरिता फायनान्सरच्या बायकोला आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही तुमची रक्कम पूर्ण देऊ. तरीही समोरची मंडळी ऐकत नव्हती. फायनान्सरने सरिताच्या पाठीशी तुम्ही घर विका, नाही तर घर आमच्या नावावर करा असा तगादा लावला होता. रक्कम तर ४ लाखांची होती पण त्यासाठी ते घर नावावर करायला सांगत होते. सरिता राहत असलेले घर हे तिचं नसून सासऱ्यांच्या नावावर होतं.

सरिताने चांगल्या वकिलांची मदत घ्यायचे ठरविले. त्या वकिलांकडून असे समजले की, सरिताला चार वर्षं झाली. ४० हजार रुपये फायनान्सरला दिले. पण दिलेल्या ४० हजार रुपयांच्या व्याजातून मुद्दल मात्र काही जात नव्हती. वर्षाचं व्याज सरिताने ४ लाख ८० हजार दिलेले आहे. असं ती चार वर्षं देत आलेली आहे. तिने मुद्दल ४ लाख घेतले होते पण त्याच्यावर व्याज ४ वर्षांत जास्त पटीने दिलेलं आहे. तरीही मुद्दल तिथल्या तिथेच आहे. तिने ज्या वकिलांना पेपर दाखवले त्या पेपरमध्ये कुठेही किती टक्के व्याज घेणार, त्या पेपरमध्ये जो फायनान्सर देतोय ते फायनान्सचे लायसन नंबर. एवढेच नाही तर व्याजासह मुद्दल घेतली जाईल याचे कुठेही लिखित पुरावे नव्हते. कागदपत्रामध्ये किती टक्के व्याज हे लिहिलेलं नसतानाही १० टक्के व्याज सरिता भरत होती. ४ वर्षे झालेले. त्याच्यात फक्त दोन महिने तिने व्याज भरलं नाही पण या ४ वर्षांत कितीतरी पटीने तिने फायनान्सरला पैसे दिले होते तरी फायनान्सर तिच्यामागे आमच्या नावावर घर करण्याचा तगादा लावून बसले होते.

सरिताला वाटलं की, बँकेसारखं फायनान्सर लोन देत आहे. कारण बँकेमध्ये व्याजासोबत मुद्दलही कट केली जाते. पण या प्रायव्हेट फायनान्सरकडे तसं नसतं हे तिला आता ४ वर्षांनं समजलेला आहे. ज्यावेळी तिने दुप्पट रक्कम त्या फायनान्सरला दिलेली आहे त्याच्यानंतर तिला हे समजलं. तिला फोन करून फायनान्सर आणि त्याची पत्नी एवढं त्रास देत आहेत की, तिला जगणंही मुश्कील झालेलं आहे. तिची आर्थिक परिस्थिती डगमगल्यामुळे तिला हा सगळा प्रकार समजला नाही, तर ती व्याज देत बसली असती आणि तिला वाटलं असतं की त्याच्यातून मुद्दल कट होत आहे.

फायनान्सर करणाऱ्यांना माहीत असतं की, समोरचे गरजवंत आहेत आणि त्यांना पैसा द्यायचा आहे तर पेपरवर सही करताना त्यांचा पेपरकडे लक्ष नसतो याची जाणीव या फायनान्सरला झालेली असते. त्यामुळे हे फायनान्सर अशा गरजू लोकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवतात आणि त्यात त्यांना फसवतात. एवढेच नाही सिव्हिल खराब केलेला असल्यामुळे तिला इतर बँकांकडून आता लोनही मिळत नाहीये. अशी परिस्थिती त्या फायनान्सरने करून ठेवली आहे.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -