
यूपीएससी परीक्षार्थींसोबत घडला धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवत असतात. वर्षानुवर्षे मेहनत करुन विद्यार्थी या परिक्षेची तयारी करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका केंद्रावर गुगल मॅपने (Google map) चुकीचा रस्ता दाखवल्याने यूपीएससीचे (UPSC) परीक्षार्थी परीक्षा देऊ न शकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे साहजिकच या परीक्षार्थींना अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. सदर प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. बाहेरील जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी विवेकानंद महाविद्यालयात येणार होते. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजच्या पत्त्याचा घोळ झाल्याने आणि गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन दाखवल्याने अनेकांना परीक्षेस मुकावे लागले.
गुगल मॅपवर या कॉलेजचा पत्ता वाळूज पंढरपूर येथे असल्याचंही दाखवत असल्याने हे विद्यार्थी वाळूज पंढरपूरला गेले होते. मात्र तिथे हे कॉलेज अस्तित्वात नाही आणि कुठलीही परीक्षा देखील चालू असल्याचे निदर्शनास आले नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गेटवर २ ते ३ मिनिटे उशिरा आल्याने त्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यानंतर या विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.