Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनमराठीचा अविस्मरणीय शिलेदार

मराठीचा अविस्मरणीय शिलेदार

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

मराठी भाषेच्या महानतेचा फक्त उदोउदो न करता तिची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण व्हावी म्हणून काम करणे अत्यंत निकडीचे आहे ही जाणीव अध्यापनाच्या क्षेत्रात काम करताना वारंवार जाणवत होती. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पलीकडे जाऊन मराठीच्या अभ्यासक्रमात बदल व्हायला हवेत. उपयोजित मराठीच्या अंगाने अभ्यासक्रम तयार व्हायला हवेत हे स्पष्ट दिसत होते आणि एके दिवशी आपला परममित्र या नियतकालिकाचे संपादक माधव जोशींची महाविद्यालयात भेट झाली. परममित्र या नियतकालिकाचा परिचय झाला. आमच्या ग्रंथालयात ते विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध झाले, यापलीकडे माधव जोशी या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख झाली. त्यांनी ‘मराठी विषय नि उपलब्ध कार्यक्षेत्रे’ किंवा मराठीतून करिअर संधी अशी कार्यशाळा संयुक्तपणे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला.

मी नि माझा सहकारी मित्र अभिजित देशपांडे यांनी तो उचलून धरला. आमच्या क. ज. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालयाचा मराठी विभाग नि आपला परममित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आंतर महाविद्यालयीन स्तरावर पार पडली. अशा कार्यशाळा अन्य महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते आवर्जून विविध महाविद्यालयांतील मराठी विभागांना भेटी देत. मराठीचा विचार ‘रोजगाराची भाषा’ म्हणून होणे ही नव्या पिढीची गरज आहे, हे त्यांनी ओलखळे होते नि त्याचबरोबर ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण करणारे जे कार्यकर्ते संपादक – प्रकाशक महाराष्ट्रात आहेत, त्यांच्यात माधव जोशी नाव महत्त्वाचे होते. त्यांच्याबद्दल भूतकाळात लिहिताना मन अस्वस्थ होते. समाज, साहित्य, संस्कृती, कला नि मुख्य म्हणजे भाषेचा सजग अभ्यासक हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य पैलू. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते मान्यवर सदस्य होते. राज्यात मराठीचे भाषाधोरण यावे म्हणून पाठपुपरावा करणाऱ्या आघाडीच्या शिलेदारांमध्ये त्यांचे नाव घ्यावे लागेल.

विविध विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वांसोबत विचारांचे आदानप्रदान करत राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. टोकाचा दुराग्रह म्हणून तर त्यांच्या ठायी कधी जाणवला नाही. मराठी पुस्तके प्रकाशित करणे, मराठी नियतकालिक चालवणे ही प्रचंड धाडसाची कामे नि ती अंगावर घेऊन व्यवसाय म्हणून निभावण्याकरिता तर आणखीनच हिंमत लागते. माधव जोशी हे या अर्थाने खूप धाडसी, हे तर खरेच!

जेथे आहे बा ग्रंथक्षेत्र, तेथे भेटती परममित्र!
तैसा आनंद अन्यत्र लाभेना कुठे
हे ब्रीद जपत त्यांनी निष्ठेने ग्रंथव्यवहार केला. त्यातही लोकप्रिय ठरू शकतील अशा कथा-कादंबऱ्या व चांगला पैसा देतील अशी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी वाट सोडून त्यांनी अवघड वाट निवडली. इतिहास, समाज नि संस्कृतीची जडणघडण करणारी पुस्तके त्यांनी निवडली. नव्या क्षेत्राचा परिचय करून देणारी, विविध ज्ञानशाखांशी निगडित, ऐतिहासिक, सामाजिक विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. जी कधीच ‘खूपविकी’ पुस्तके नव्हती. काही महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय विषयांवरील पुस्तकांचे अनुवाद त्यांनी प्रकाशित केले. उदा. दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार हा मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री या पुस्तकाचा अनुवाद.

गजानन मेहेंदळे व संतोष शिंत्रे लिखित ‘शिवछत्रपतींचे आरमार’ किंवा अनुराधा कुलकर्णी यांनी संपादित केलेला ‘शिवछत्रपतींची पत्रे’ हा दोन खंडांतील देखणा ग्रंथ, वेध अहिल्याबाईंचा हा डॉ. देवीदास पोटे लिखित ग्रंथ, संत तुकारामांवरचे दोन प्रदीर्घ खंड, वारी सारखा विषय अशी अनेक पुस्तके माधव जोशींनी प्रकाशित केली. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून धडपडणारं हे व्यक्तिमत्त्व अविस्मरणीय. त्यांना विनम्र भावांजली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -