Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगोष्टीची गोष्ट

गोष्टीची गोष्ट

“गोष्टी? गोष्टींची गोष्ट ‘बेबीची’ बाराखडी होईतो पुढे पुढे गेलीय बाईसाहेब.”
“बघीन बघीन नि सरळ मंगेशला सांगून टाकीन.” “आपला मुक्काम अन्य ठिकाणी हलवा म्हणून.”

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

वसुधा वाटच पाहत होती.
मि. करुणाकरांची. वसुधाचे अहो. फिरतीवर गेलेले.
आले एकदाचे.
“या. स्वागत आहे. आपल्याच घरात.” वसुधा सुहास्य मुद्रेने करुणाकरांना म्हणाली. पायावर दूध, पाणी घातले.
“अरे! काय हे? चार-पाच दिवसच तर बाहेर होतो.” ते म्हणाले.
“हे चार-पाच दिवस मला चार-पाच युगांसारखे वाटले अहो!”
“या चपला कुणाच्या?” जाडसर चपलांकडे नजर रोखत, अहोंनी विचारले. चपला पुरुषी वाटत होत्या. मोठ्या होत्या. आठ नंबर!
“माझ्या नाहीत.” ते अधिकारवाणीनं म्हणाले.
“मंगेश आलाय का?” त्यांनी विचारले.
“मंगेश? वाट बघा! बायकोचा कोंबडा! आरवतोय लांडा!”
“असं बोलू नये. बाईसाहेब, शांत शांत!”
“बोलावं लागतं हो. किती बायको बायको? अगं, अगं, अगं, अगं बेबी… बेबी… बेबी…”

“हल्ली बायको नवऱ्याला लाडानं बेबी बेबी म्हणते. आलंय माझ्या कानावर. आपली सूनसुद्धा मंगेशला बेबी म्हणूनच हाकारते कितींदा. मी ऐकलंय ना!”
“बरं दिसतं का हे?”
“नाही. पण नवी पिढी आहे. चालायचंच.”
“मला अजिबात आवडत नाही, हे असलं वागणं!”
“तुला कोणी विचारलंय का? मग का डोक्याला ताप करून घेतेस?”
“अशा गोष्टी उघड उघड माझ्या घरात नाही चालणार.”
“गोष्टी? गोष्टींची गोष्ट ‘बेबीची’ बाराखडी होई तो पुढे पुढे गेलीय बाईसाहेब.”
“बघीन बघीन नि सरळ मंगेशला सांगून टाकीन.”
“काय सांगशील गं?”
“आपला मुक्काम अन्य ठिकाणी हलवा म्हणून.”
“अगं तो काय? वचनालाच बांधलाय माझ्या! म्हणून राहतो इथे.”
“तुम्ही सांगितलंत? इथे राहा म्हणून?”
“अगं त्याची बायको रिझर्व्ह बँकेत नोकरी करते. तिला क्वार्टर्स सहज मिळतात.”
“काय सांगता?”
“मी सांगतोय ना! विश्वास ठेव. बाबा नि आई यांना सोडून नको जायला, असा सुनेचा इरादा आहे.”
“तरी पण जातेच ना आईकडे? आठवड्यातून पाच वेळा?”
“गळा काढू नकोस पॉच पॉचचा!”
“जवळ आहे म्हणून जाते. हे तिचंच पालुपद!”
“अगं जाऊ दे!”
“लगेच आमचं प्यादं बायकोच्या मागे मागे.”
“अगं नवं नवं, हवं हवं आहे.”
“इतकी काही सुंदर नाही ती.” वसुधा म्हणाली.
बायको रागावली, हे ‘अहो’नी ताडले.
“पण ज्याची नार त्याला प्यार! हो ना बायको?”
“हो.”

“आता सांगशील का कोण आलंय? की अजून रुसवा कायम आहे?”
“मंगेशच्याच चपलायत त्या. दोघं बेडरूममध्ये दिवसाढवळ्या घट्ट दार बंद करून झोपलेत मधखोलीत.”
“मधखोलीत? म्हणजे आपल्या बेडरूममध्ये?”
“हो.”
“मग मी कुठे विश्रांती घेऊ?”
“माझ्या बोडक्यावर!”
“किती तो त्रागा? अगं त्यांचं नवं नवं आहे. आपले दिवस आठवं. नवं नवं …हवं हवं…”
“नौरोजी! ३० वर्षांपूर्वीच्या बाता आता नकोत. मी दरवाजा खडखडावते. चट उठतील. ही का कड्या लावून झोपायची वेळ आहे?” वसुधा कडकडा कडकडा कडी वाजवली.
उघडेनाच. मग आणखी आकसाने जोरजोरात वाजवली.
“काय गं आई?” मंगेश डोळे चोळत म्हणाला.
“अरे काय करताय कड्या कुलपात?” आईने खडसावून विचारले.
“नवरा-बायको करतात,
तेच करतोय आई!”
“अरे किती दिवस नव्याची नवलाई?”
एव्हाना सून डोळे चोळत बाहेर आली. म्हणाली नवऱ्याला…
“चल रे, आपण माझ्या आईकडे जाऊ!” तो काय? बायकोचा कोंबडा! आरवत आरवत आपल्या सासरी गेला!
पुढची गोष्ट मी सांगायला नकोच!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -