कथा – प्रा. देवबा पाटील
आज परीताईची यशश्री खूपच वाट बघत होती कारण परी आज तिला धूमकेतूविषयी माहिती सांगणार होती. परी आल्यावर, चहापान झाल्यानंतर “ते धूमकेतू कसे असतात व त्यांना अशुभ का मानतात परीताई?” “यशश्रीने विचारले.”
“तेही मुळीच अशुभ नसतात, तर तीही आकाशातील एक प्रक्रियाच असते. बघ यशश्री, धूम म्हणजे धूर आणि केतू म्हणजे शेपटी. ते धूमकेतू धुराच्या शेपटीसारखे दिसतात म्हणून त्यांना धूमकेतू म्हणतात.” ‘‘परी पुढे बोलू लागली,’’ “खडक, धातू, वायू, बर्फ व धूळ यांच्या गोठलेल्या मिश्रणाच्या गोळ्यापासून धूमकेतू बनतो. त्याला डोके, धड व शेपटी असे तीन भाग असतात. त्यांची लांबी ५ ते १० कोटी मैल असते. सूर्याभोवती असे अनेक धूमकेतू फिरतात. धूमकेतूंच्या पट्ट्याला “उर्टचा मेघ” असे नाव आहे. ते केरसुनीच्या पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतूंची कक्षा अतिप्रचंड लंबगोलाकृती असते. त्यामुळे सूर्य हा त्या कक्षेच्या केंद्रस्थानी नसून एका टोकाला असतो. त्यामुळे तो कधी सूर्याच्या खूप जवळ तर कधी सूर्यापासून अतिशय दूर असतो. तो सूर्यापासून दूर असताना थिजलेला आणि घन असतो.”
“तो जर घन असतो तर मग त्याला शेपटी कशी दिसते ताई?” “यशश्रीने मध्येच रास्त शंका विचारली.”
“जसजसा तो सूर्याच्या जवळ येतो तसतसा त्याचा काही भाग सूर्याच्या उष्णतेने वितळून वायुरूप होतो. सूर्यापासून येणारे सौरवारे या वायूंना व धूलिकणांना सूर्यापासून दूरवर पसरवतात. त्यामुळे धूमकेतूला सूर्याच्या विरुद्ध बाजूस धूळ व वायूंची एक लांबलचक पिंजारलेली शेपटी किंवा शेंडी तयार होते. त्या शेंडीमुळे त्याला शेंडीचा तारा किंवा शेंडे नक्षत्र अथवा पुच्छल ताराही म्हणतात. धूमकेतू सूर्याच्या जितका जास्त जवळ तितकी जास्त लांब त्यांची शेपटी असते. ही शेपटी अवकाशात लाखो किलोमीटर लांब पसरलेली असते. सूर्यप्रकाशाने धूमकेतूचे डोके आणि धड तर आधीच धुसरपणे चमकत असते व आता या वाफाळ शेपटीतून सूर्यकिरण गेल्याने ती शेपटी धुरासारखी पांढुरकी दिसते. धूमकेतू आपल्या कक्षेत फिरताना ज्यावेळी ते सूर्याच्या जवळ येतात त्याचवेळी ते प्रकाशमान होतात व आपणास दिसू शकतात. ते जेव्हा दूर जातात तेव्हा आपणास दिसत नाहीत.”
“परी सांगत होती.”
“पण परीताई, जशा उल्का नेहमी दिसतात तसे धूमकेतू नेहमी का नाही दिसत?” “यशश्रीने प्रश्न केला.”
“त्यांची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा ही वाटोळी व अति लांबट (लंब वर्तुळाकार) असल्याने ते नेहमी सूर्यापासून खूपच दूर असतात. त्यामुळे ते सूर्याभोवती फिरताना जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हाच ते फार क्वचित व दीर्घ काळानंतर दिसतात. धूमकेतू अमूकच दिशेने येतात असे नाही तर ते कोणत्याही दिशेने सूर्याकडे येतात व सूर्याला डावीकडून किंवा उजवीकडून वळसा घालून माघारी जातात. काही वेळा धूमकेतूला अनेक शेपट्या फुटल्याचेही दिसते. ज्यावेळी ते सूर्यापासून दूर जातात त्यावेळी प्रथम त्यांच्या शेपट्या नाहीशा होतात व नंतर ते सूर्यापासून खूप लांब जात अदृश्य होतात म्हणजे आपणास दिसत नाहीत.” “परीने सांगितले.”
“परीताई आमच्या पृथ्वीवरून जसे आकाशातील तारकासमूह दिसतात त्याप्रमाणे तुमच्या मही ग्रहावरूनही ते तसेच दिसतात का?” “यशश्रीने विचारले.”
“हो. तुमच्या पृथ्वीवरून आकाशातील तारकासमूह जसे दिसतात तसेच जसेच्या तसे ते आमच्या मही ग्रहावरूनही दिसतात कारण तुमची सूर्यमाला व आमची मित्रमाला या अवकाशात एकमेकींना जणू समांतर वाटचाल करीत आहेत व आपापल्या सर्व ग्रह, उपग्रह व इतर साऱ्या घटकांसह दोघींचीही गती नि स्थिती सारखीच आहे. म्हणजेच आपले दोन्हीही ग्रह हे त्यांच्या गतीज स्थितीबाबत एकमेकांसोबत समक्रमिक व समकालिक आहेत. तसेच बाकीचे सर्व तारे हे आपल्या दोन्हीही तारकामालांपासून म्हणजेच आपल्या दोन्हीही ग्रहांपासून खूप खूप अतोनात दूर आहेत. त्यामुळे आकाशातील सारे तारे आपल्या दोन्हीही ग्रहांवरून जवळपास सारखेच दिसतात.” “ परीने स्पष्टीकरण दिले.”
“यशश्री आज की नाही मला एक खूपच महत्त्वाचे काम आहे, तर आपण राहिलेले ज्ञानसत्र उद्या घेऊ.” “ परी म्हणाली.” “हो ताई.” “यशश्री उत्तरली. आणि परीने आपला मोर्चा वळविला.”