निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
नालंदाचा अर्थ एक अशी भेट की, ज्याची कोणतीही सीमा नाही. अमर्यादित ज्ञानाची परिपूर्ण भेट. नालंदा (मगध) म्हणजे आताचे बिहार. पटनापासून ९५ किलोमीटर दक्षिणेला आहे. २३ हेक्टर जमिनीवर निसर्गाच्या सानिध्यात आमराईत असणारे नालंदा हे दुसरे भव्यदिव्य विश्वविद्यालय. नालंदाची स्थापना इसवी ४२७ मध्ये कुमार गुप्त यांनी केली आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी संस्था आणि मंदिरे उभारून विस्तार केला. भारतीय संस्कृती आणि संस्कार टिकवणारे हे विद्यापीठ. विज्ञान आणि अध्यात्म याच्या संगमाचे विद्यापीठ. नालंदा म्हणजे ज्ञानाचा अविरत वाहणारा प्रवाह. हे तक्षशिलेसारखेच वेदांतीत होते. हे विद्यापीठ वैज्ञानिकदृष्ट्या, भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आणि ज्ञानवर्धक होते.
येथे वेद, व्याकरण, गद्य-पद्य, भौतिक, चिकित्सा, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, योग, कला यांचे शिक्षण दिले जायचे. नैसर्गिक विज्ञान प्रक्रिया काय आहे, हे प्राचीन काळात अध्ययनांतर्गत यांना माहीत होते.
आध्यात्मिक व्रतपालन येथे होत असे. ध्यानधारणेअंतर्गत शारीरिक, मानसिक क्रिया नियंत्रण होत असे. नैसर्गिक चिकित्सा प्रणालीबद्दल नालंदामध्ये अतिउच्च ज्ञान दिले जायचे. नालंदामध्ये चायना, जपान, कोरिया, पर्शिया, टर्की, इंडोनेशिया, श्रीलंका असे जगभरातील विद्यार्थी अभ्यासासाठी येत असत. नालंदाची रचना म्हणजे वाचनालय आणि महाविहार येथे पूर्ण परिसराला एक तटबंदी होती आणि आजूबाजूला लहान लहान गावे होती. येथील बौद्ध मठात वास्तव्यास अनेक बौद्ध भिक्षुक राहत होते. खरं तर येथे दोन्ही प्रकार आहेत-चैत्य आणि विहार. जवळजवळ ११ मोठमोठ्या खोल्या. अध्यापकांसाठी समोरच्या बाजूला आसन व्यवस्था. दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांसाठी निवासस्थाने.
खोल्यांच्या पुढच्या बाजूस एक मोठी अरुंद वाट आणि मध्ये प्रशस्त खोली जिथे वर्ग भरत. बाहेरच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना बुद्धाच्या दोन मूर्त्या. एक प्रशस्त खोली म्हणजे तेथील वर्गात ३५ ते ४० खोल्या आहेत. अशा एकूण ३३० खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये ध्यानधारणेची एक गुफेसारखी खोलीसुद्धा आहे. या सर्व रचनांमध्ये बुद्धाचे एक मंदिरही आहे.
कोणत्याही खोलीला दरवाजा आणि छत दिसत नाही. हे कदाचित लाकडाचे असावेत. येथे अनेक लहान-मोठ्या स्तुपांच्या रचना आहेत. मोठ्या अध्यापकांच्या आणि लहान या विद्यार्थ्यांच्या आहेत. ज्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधल्या गेलेल्या आहेत. तिथे बुद्धांच्या एका शिष्याचा विशाल अष्टकोनी स्तूप आहे, जो त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक म्हणून आहे.
आज त्या ३० मीटर अष्टकोनी पिरॅमिडसारख्या आकाराची रचना ही भग्नावशेषामध्ये पाहायला मिळते. तिथे वर जाण्यासाठी विटांच्या पायऱ्या आहेत. आजूबाजूला चौकोनी कठडे आणि त्यावर छोटे छोटे स्तूप आणि मंदिर आहेत. बुद्धाच्या अहिंसक पाच गुणांच्या आठवणीसाठी पंचशीला मंदिर आहे. येथे अध्यापक आणि विद्यार्थी यांच्या वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे असणाऱ्या बैठक व्यवस्था, कलाकुसरीच्या मूर्त्या, नक्षीयुक्त मोठी घंटा आणि नऊ मजल्याचे वाचनालय होते. जिथे असंख्य हस्तलिखित, विविध विषयांवरील वाड्मय ज्ञानभंडार होते. मुळात ध्यानधारणा करण्यासाठी असणारी नैसर्गिक व्यवस्था होती. धातूविषयक हस्तशिल्प बनविण्याचे शिक्षणसुद्धा दिले जात असे. जातक कथा, ध्यान मुद्रा यातील शिल्प रचना होत्या. आश्चर्य म्हणजे विटांचे बांधकाम इतके बेमालूमपणे केले आहे की, पावसामध्ये पाण्याचा एकही थेंब आत येत नाही. महत्त्वाचं म्हणजे येथील भिंतींची जाडी आठ ते दहा फुटांपर्यंत आहे. इथे अत्यंत शांतता, सकारात्मकता जाणवते. बौद्ध धर्म म्हणजे अहिंसा. या दोन्ही विश्वविद्यालयांत बौद्धांचा खूप मोठा वाटा असला, तरी सर्व धर्मीय मोगल सोडून इथे अध्ययनासाठी येत असत. त्या काळात भोजपत्रांवर हस्तलिखित लिहिली जायची.
या विद्यापीठात ताम्रपत्रांच्या आत असणारी भोजपत्रे, हस्तलिखित यांची संख्या जवळजवळ ९० लाख होती. यासाठी नऊ मजले वाचनालयाची एक मोठी इमारत बांधली गेली होती. त्यात अनेक ज्ञान भंडारे होती, ज्ञानाचा खजिना होता. येथे प्रत्येक विषय हाताळले गेले होते. गुप्त वंश, हर्षवर्धन आणि पाल वंश यांचा या समृद्धीत महत्त्वाचा हातभार होता. येथील खर्च राजे आणि व्यापारी करीत असत. नालंदामध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नव्हती, त्या ऐवजी ते तिथे असलेल्या अध्यापकांची आणि नालंदा विद्यापीठाची सेवा करीत. ज्योतिष तज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट हे या विद्यापीठाचे प्रमुख होते असे म्हणतात. येथे हर्षवर्धन, वासू बंधू, धरमपाल, नागार्जुन, पद्मसंभव आणि युवान श्वांग यांनी शिक्षण घेतले. आठशे वर्षांपर्यंत जवळजवळ हे विद्यापीठ ज्ञानकुंजाने बहरत होते. परंतु बाराव्या शतकात याचा अंत झाला. तो का आणि कसा हे आपण पाहूया.
इतिहास नेहमी गहन संशोधनाचा विषय असला, तरी ऐकीव आणि अवशेषात्मक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे बऱ्याचदा याबाबतीत आपण ठामपणे बोलू शकत नाही. त्या काळात अनेक आक्रमणे होत होती. त्यात आपले नालंदासुद्धा होते. इथे सतत तीन आक्रमणे झाली. प्रथम मिहीरकुला- हुणांनी ४५५ ते ४६७ मध्ये समुद्रगुप्त असताना केले. त्यानंतर परत मोठ्या प्रमाणामध्ये नालंदाचा जीर्णोद्धार करण्यात आला. दुसरे आक्रमण सातव्या शतकात बंगालमधील गौदास राजवंश यांनी केले. तेव्हासुद्धा बौद्ध राजा हर्षवर्धन यांनी याचा पुनर्विकास केला. परंतु तिसऱ्या आक्रमणामध्ये याचा पूर्णपणे शेवट झाला.
१९९९ ची घटना. अफगाणिस्तानचे इस्लामिक राजा मोहम्मद बिन बख्तीयार खिलजी. एक दिवस बख्तीयार खिलजी आजारी पडला. कोणतीही औषध त्याच्यावर काम करत नव्हती. तेव्हा त्याला नालंदामधील आयुर्वेदाचार्य आचार्य राहुल भद्राचार्य यांची औषध घेण्यास सुचवले. परंतु त्याला हिंदू वैद्याची औषधं घ्यायची नव्हती. त्यामुळे राहुल भद्राचार्य त्याच्याकडे कुराण घेऊन गेले आणि त्याला ते वाचण्यास सांगितले. तो बरा झाला. तेव्हा कुराण शोधण्यासाठी म्हणून त्याने पूर्ण नालंदा पालथे घातले. त्याला कुराण काही मिळाले नाही. मग त्याला कळले की, कुराणाच्या प्रत्येक पानाला आचार्यांनी अदृश्य औषधी लेप लावला होता. त्यामुळे बोटांनी पान उलटत असताना, ते औषध त्याच्या जिभेला लागत असे आणि त्यामुळे बख्तीयार बरा झाला होता. आता हिंदू आयुर्वेदाचार्यांचे ज्ञान त्याला सहन झाले नाही आणि त्या सूडबुद्धीने अपकारी, क्रूर बादशहाने सर्व नालंदा जाळून टाकले. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी होती.
जवळजवळ तीन महिने नालंदा जळत होते. जेव्हा येथे खिलजीने आक्रमण करून आग लावली, तेव्हा काही बौद्ध भिक्षुकांनी येथील या ग्रंथांचा खजिना जेवढा हाती लागेल, तेवढा घेऊन ते पळाले. जे आपल्याला ‘लॉस एंजिल्स काऊंटी म्युझियम ऑफ आर्ट’मध्ये आणि तिबेटचे ‘यार लुंग म्युझियम’ येथे पाहायला मिळतो. नालंदामधून युवान श्वांग यांनी ६५७ बौद्ध ग्रंथ नेलेत. ज्याचा त्यांनी नंतर अनुवाद करून, जगभर प्रसार केला. चायनीज आयुर्वेदिक औषधे, पारंपरिक चिकित्सा, युनानी औषधे यांचे सर्व भारतीय आयुर्वेदिक औषधे आणि चिकित्सा यांच्याशी बऱ्यापैकी साम्य आहे. आता याचा अर्थ काय ते समजून जावे. नालंदाचा बराचसा भाग आता भग्नावशेषामध्ये जळालेल्या अवस्थेत आहे. इंग्रजांनी बऱ्यापैकी याची डागडुजी केली, प्रवेशद्वार सुद्धा बांधले. वाईट याच गोष्टीचा वाटतं की, आपल्याकडे पूर्वजांनी दिलेला एवढा खजिना असताना, त्याकडे सरकारचे पाहिजे तसे लक्ष नाही. कुठेही त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत, ही भारतामधील वस्तुस्थिती आहे. तसं पाहिलं तर २०१७ पासून नालंदाचा पुनर्विकास करण्यास सुरुवात झाली आहे.
ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना, पूर्ण अध्यापन केल्याशिवाय करू नये, हे सुद्धा तितकच खरं. नालंदाचा विचार केल्यास, जर नालंदा तीन महिने किंवा अजून अधिक महिने जळत असेल, तर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? पर्यावरण संतुलनासाठी कार्य करणाऱ्या घटकांचं काय? शिवाय वातावरण प्रदूषित झाले ते वेगळच. त्यांनी फक्त नालंदालाच अग्नीच्या आहारी केले नाही, तर पर्यावरणपूरक घटकांची जीवितहानी अपरिमित केली, ज्याला शब्दच नाहीत. या जगातील धर्म म्हणजेच कर्म याची बंधन फक्त सनातन धर्मातच आहेत. जर आपण हा धर्म संरक्षित करू शकलो नाही, तर साहजिकच आपल्याला इतर कमकुवत धर्माच्या अधीन व्हावं लागेल. म्हणून वेळीच सावध होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतीय संस्कृती आणि संस्कार टिकवणारे, कर्मबंधन समजणारे या विश्वात फक्त हिंदुत्व हेच आहे.
या अद्भुत रचनांचा नाश फक्त शत्रुत्व आणि धर्म यांच्या द्वंद्वात झालेला आहे. कारण आपण माणुसकी विसरलो आहोत. पूर्वीची मुघलांची आक्रमण आणि आताचे आतंकवादी हमले दोन्ही एकच. काळ बदलला पण घटना त्याच. काळानुसार सुद्धा काहीही नियंत्रणात आणले गेले नाही. अतिशय दुःखद आणि घृणास्पद अशा या घटना अजूनही अविरत चालूच आहेत. एक प्रश्न नेहमीच अनुत्तरीत असतो… सर्व विश्वात मानव हा फक्त धर्मच मानतो, कर्म का नाही? सनातन धर्म हा धर्म नसून हिंदुत्व म्हणजे कर्मावर विश्वास ठेवणारा, तत्त्वनिष्ठ म्हणून तो श्रेष्ठ आहे. अनेक कलियुग येतील संपतील; पण हा सनातन धर्म-कर्म कायमच राहील. पण जेव्हा मानवाला कर्मबंधन समजतील, तेव्हाच धर्मबंधन गळून पडतील आणि त्यासाठी सर्वांनी सद्गुणसुवर्ण मार्ग अवलंबणे आवश्यक आहे.