Saturday, July 5, 2025

Solapur News : धक्कादायक! स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह गायब

Solapur News : धक्कादायक! स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह गायब

जादू टोण्याच्या प्रकारासाठी मृतदेह चोरल्याचा संशय


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजवर सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र सोलापूरमध्ये चक्क मृतदेह चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्मशानभूमीत दफन केलेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब झाला आहे. जादू टोण्याच्या प्रकारासाठी मृतदेह नेला असल्याची गावभरात चर्चा सुरु असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांश वाघमारे (१० महिने) असे मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी त्याच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. आज रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी वाघमारे कुटुंबिय मोदी स्मशानभूमीत पोहचले. मात्र यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी एक खड्डा आढळून आला.


प्रियांशचा मृतदेह कुणीतरी उकरून नेला असावा, असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. स्मशानभूमीतून मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जादू टोण्याच्या प्रकारासाठी कुणीतरी बाळाचा मृतदेह उकरून नेला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.


दरम्यान, या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

Comments
Add Comment