
नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने धरला जोर
सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा (Sangli Zilla Parishad) अजब कारभार समोर आला आहे. कन्नड माध्यमाच्या (Kannada medium) शाळेमध्ये परिषदेने चक्क मराठी माध्यमाच्या (Marathi medium) ११ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे हे शिक्षक कन्नड विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कनन्ड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील १० कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये ११ मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही नियुक्ती केली गेली आहे. या भोंगळ कारभारावर जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आरोप केला आहे. कन्नड शाळेतील मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विक्रम सावंत यांनी केली आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.
कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होईल
जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर राज्य सरकारच्या १३२ कन्नड शाळा आहेत. मात्र, यामधील १० शाळांमध्ये ११ मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ते शिकवणार काय? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या भोंगळ कारभारनामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.