मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे आपुले.
“जनसेवा हीच ईश्वर सेवा”
आजच्या वास्तव जगामध्ये कर्माला मोलाचे स्थान आहे. माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा आणि हे विश्वचि माझे घर सांगणारे ज्ञानियांचे राजा ज्ञानोबा माऊली. गीतेतून श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदांचन” निष्काम कर्मयोगी व निरपेक्ष भावनेतून सत्कार्य केले की, जगण्याला अर्थ आणि जगणे सार्थ होते. नाहीतर सारे व्यर्थ निरर्थक ठरते. स्वानंद निर्मिती, सृजनशीलता, संवेदनशीलता, सर्जनता निर्माण होण्यासाठी सत्कर्म करावे. समर्थ रामदास म्हणतात, मना चंदनापरित्वा झिजावे. चंदन… सुगंध देण्याचं सोडिल का? तोडले, कोरले, झिजले, तरी हीच साधुसंतांची शिकवण! माणसासारखे हात एकाही प्राण्याला नाही. संस्कृतीचा इतिहास असेल किंवा पाषाणाची मूर्ती धरतीची शेती, नैवेद्याची निर्मिती आणि देवाची आरती ही हातांमुळेच होते. संत कवयित्री बहिणाबाई म्हणतात, हात काही उगारण्यासाठी नाही! उभारण्यासाठी दानधर्मासाठी हे!! याच हातांनी बाबा आमटे यांनी रानात नंदनवन निर्माण केले. वृक्ष, नदी, सूर्यदेव धर्मभेद न करता देत आणि देतच असतात. तेही निपक्षपाती हेच तर निसर्गाकडून शिकावे. दुःखी, कष्टी, रंजल्यागांजल्या लोकांसाठी सेवेसारखं पुण्य नाही. मदर टेरेसा यांचेही असेच आहे.
विचार आणि इच्छाशक्तीच्या आधारे माणूस कुठे पोहोचू शकतो? जीवनात जे काही घडते ते प्रयत्नांमुळेच जीवन ही गीता आहे जिथे दैवी गुण संपत्तीचे विवेचन आढळते. आचार्य विनोबा भावेंनी गीताईतून मार्मिक असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. जीवनाच्या पावलोपावली ते उपयुक्त आहे. तर समर्थ रामदासांनी सुद्धा मनाच्या श्लोकात अतिशय सुंदर लिहिले आहे. संतश्रेष्ठ बहिणाबाईंनी सुद्धा आपल्याला माणसाच्या अवयवांवरून स्वभाव दर्शन मानवता जीवनाचे तत्त्वज्ञान आणि भक्ती आपल्या मनात रुजवली आहे. भक्ती ही सामाजिक शक्ती आहे असे सांगणारे स्वाध्याय प्रवर्तक पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, “वे ऑफ लाइफ वे ऑफ वर्शिप वे ऑफ थिंकिंग या त्रयीतून संस्कृती उभी राहते. अंधपतनातून जगाला वाचवून चिरकालीन, आत्मीक, चैतन्यमय, विचार दैवी, अध्यात्म, संस्कृतीची ओळख करून देतो. भगवंत जयवंत करतो. सामाजिक क्रांतीच नव्हे तर भावनिक क्रांती होण्यासाठी अध्यात्मिक क्रांती महत्त्वाची आहे. ती शक्ती परमेश्वर देतो आणि परमेश्वराची एकरूप झालो की आपोआप आपण सचेतन मनाला त्याच्या स्वाधीन करतो.
आत्मतत्त्वाचा बोध, भक्ती, ज्ञान व योगात आहे. हे अमरत्व तत्त्वज्ञान, ध्यानधारणा, अध्यात्म, चिंतन नामस्मरण यातून मनावर कोरले जाते.
अंधाराकडून प्रकाशाकडे, अमूर्तकडून मुर्ताकडे आणि असत्याकडून सत्याकडे नेणारी भक्ती विवेकाची प्रचिती आहे. जाणिवेकडून नेणीवेकडे काया-वाचा-मने जाणे तरल संवेदनांचे भान ठेवून. मनाचे ध्यान करणे म्हणजे मौन! वेदना या शारीरिक असतात, तर यातना मानसिक असतात. शरीर व मन यांना मागे टाकून चिंतनाकडे जाणे. आज दुःख मुक्तीचा खरा मार्ग मोक्षाकडे नेणारा आहे. मृत्यूचे भय घालविणारा, तत्त्वज्ञ योगी साधू-संत, संशोधक, अभ्यासक, महात्मे हेच प्रतिपादन करतात. राम गणेश गडकरी यांच्या ओळी आठवतात,
उदासीनता व्याकुळ करते विषन्नचित्त तेथे,
त्याला द्याया समता गाणे गावे.
हेच शरीराची जखम मनावर व मनाचे दुःख चेहऱ्यावर उमटते आणि हे नैराश्य, मानसिक आधार दिल्यास पाठबळ वाढते. दुःख कमी होऊन पतीत पावन जीवनाचे जीवनदाते परमेश्वर देवदूत डॉक्टरच नाही का? त्यांच्यासाठी रुग्ण ऋण मानता स्वच्छतेचे महत्त्व पटवून ते अथांग सेवेमध्ये वाहून घेतात. म्हणून डॉक्टर हे देवदूत आहेत. सेवाभावी, समाजसेवक आहेत. माणसांचा पुनर्जन्म करणारे आहेत. आरोग्यसेवा देणारे, सहकार्याचा आधार देऊन अमरत्वाचे दीप लावणारे आहेत. जगण्यासाठी नवी आशा, नवा प्रकाश देणारे दीपस्तंभ आहेत. खरं तर माणसाचे मन मुळात कोऱ्या कागदासारखे. अनुभवाची अक्षरे त्यावर जशी उमटतील तसे रंगरूप ते धारण करतात. अशा मनाच्या समस्या मानसिक व्यथा, वेदना, यातना यावर कृपावंत म्हणून डॉक्टर रुग्णांच्या मदतीला धावून येतात आणि ते देवस्थानी असतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा कर्मातच देव आहे कर्मे इशु भजावा.
निरपेक्ष भावनेने फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा. आपोआप फळ मिळणारच.