
१३ जणांना वाचवण्यात यश तर ४ जण बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
पाटणा : गेल्या काही दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वारंवार अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यातच आज बिहारच्या (Bihar) पाटणा (Patna news) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगा नदीवर (Ganga river) स्नान करण्यासाठी निघालेल्या भाविकांची बोट अचानक बुडाली (Patna Boat Capsizes). यामध्ये १७ प्रवासी होते, त्यातील १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर ४ जण बेपत्ता आहेत. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्याच्या निमित्ताने बिहारच्या गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गंगा स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत असतात. अशामध्येच गंगा दसऱ्याच्या दिवशीच पाटण्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. भाविकांना गंगास्नान करण्यासाठी घेऊन जाणारी बोट नदीमध्ये बुडाली. अचानक बोटीचे संतुलन बिघडले. त्यामुळे बोट नदीच्या मध्यभागी पलटी झाली. १७ जण या बोटीतून प्रवास करत होते. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
१७ जणांपैकी काही जण पोहत नदीच्या काठावर आले तर काही जणांचे प्राण वाचवण्यात स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमला यश आले. १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे व त्यांची प्रकृती ठीक आहे. तर उरलेल्या ४ जणांचा शोध सुरु आहे. एनएचएआयचे निवृत्त अधिकारी अवधेश प्रसादही बेपत्ता आहेत. अवधेश प्रसाद महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले. तर त्याची पत्नी बचावली आहे. पोलीस एसडीआरएफ टीमच्या मदतीने गंगा नदीत सर्च ऑपरेशन करत आहेत.