
योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त
कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच बनविलेल्या सिमेंट कॉँक्रिटच्या मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त झाले असून या रस्त्याचे काम देखील निकृष्ट पद्धतीने केले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी या खड्ड्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच पावसाचे दिवस असून पावसाचे पाणी या खड्ड्यात साचून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा बुजवून रस्ता सुस्थितीत आणण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माध्यमातून एक ते दोन महिन्यांपूर्वी योगिधाम परिसराचा मुख्य रस्ता सिमेंट कॉँक्रिटचा बनविण्यात आला होता. असे असतांना योगिधामच्या सुरवातीलाच या कॉँक्रिटच्या रस्त्यात भला मोठा खड्डा खणण्यात आला आहे एक बाजूचा रस्ता खोदण्यात आल्याने सकाळी आणि संध्याकाळी रहदारीच्या वेळेस या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याला भेगया पडल्या आहेत. वर्षभरापूर्वी याठिकाणी आमदार निधीतून हे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येत असल्याचे बॅनर लावण्यात आले होते.
उग्र आंदोलन करण्याचा इशारा
टप्प्याने टप्प्याने केलेल्या कामामुळे देखील येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. असे असताना एक ते दोन महिन्यात हा रस्ता खोदावा लागतो याला कारणीभूत महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार का लोकप्रतिनिधी आहेत हा जाब विचारण्यासाठी आणि महापालिकेला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असून त्यानंतर देखील ही समस्या न सुटल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
आंदोलनात यांचा सहभाग
यावेळी या आंदोलनात संदिप देसाई यांच्यासह कैलाश भोईर, आर्किटेक गणेश नाईक, अॅड सूरज पातकर, सूजित जाधव, उमेश वाघ, विशांत कांबळे, शुक्ला, तात्या बडगुजर, केशव कांबळे, नागपाल, जेष्ठ नागरिक कदम, बनशी भंडारे, सूभाष संगारे, विकी पाफाले, जया जाधव, सिडनी सेक्रेटरी जाधव, जयस्वाल, सुरज सोनावणे आदी सर्वपक्षीय नागरिक सहभागी झाले .