मी म्हणजे मार्क नव्हेत!

Share

शिक्षणाचा मूळ हेतू मुलांना साक्षर करणं, सुशिक्षित करणं असला, तरी पालकांचं उद्दिष्ट त्याला सुसंस्कृत माणूस बनायला मदत करणं हेच असतं, हे लक्षात ठेवायला हवं. मुलं म्हणजे मार्क नव्हेत, त्यापलीकडे त्यांचं असं एक जग आहे. पुस्तक वाचनाबरोबरच माणसांची मनं वाचणं, प्रश्नोत्तर, इतरांशी संवाद करणं, वर्गात शिकवलेलं ऐकताना दुसऱ्याचं मत समजून, ऐकून घेणं, आपलंही मत मांडता येणं, लिहून शब्दांत व्यक्त होणं, चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवणं हे खरे मार्क आहेत.

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

शाळा सुटली; पण नववीच्या वर्गातली दोन मुलं मात्र वर्गातच रेंगाळत होती. तिथून जाताना माझ्या कानावर एक संवाद आला, प्रसाद माझं काही खरं नाही. यावेळी पण मी गणितात फेल झालोय. फक्त एक मार्क कमी होता. शंभरपैकी चौतीस मार्क आणि त्याखाली ओढलेली लाल शाईची रेघ. जणू काही हिणवतेय मला. तू ‘ढ’ आहेस म्हणतेय. आता घरी रिपोर्ट कार्ड दाखवलं की, माझी अक्कल निघेल. दुसऱ्या मुलांबरोबर तुलना होईल. आमचं नशीबच खोटं असा आरडाओरडा होईल. मला मारल्यानंतरच राग शांत होईल तिचा. कौशलचं बोलणं ऐकलं आणि प्रसाद म्हणाला, अरे अलाऊड असतं, तर मी तुला माझा एक मार्क दिला असता पण…

ही घटना आजच्या पंधरा वर्षांपूर्वीची. प्रसाद डॉक्टर झाला. सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतोय आणि कौशल मराठीत डॉक्टरेट मिळवून कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. नामवंत लेखक आहे आणि एवढ्यातला प्रसंग. छोट्या न्याराने खूप सुंदर चित्र काढलं आणि मला दाखवलं. कसंय चित्र मावशी? मी म्हटलं, खूप छान आहे. तू ग्रेड दे. मी लिहिलं ‘very Good.’ तू ग्रेड दे. बरं म्हणत मी A grade लिहिलं पण तिला A+ ग्रेड हवी होती. शेवटी मी A+ लिहिलं. मला वाटलं जे पंधरा वर्षांपूर्वी होतं, तेच मार्कांचं दुष्टचक्र आजही तसंच सुरू आहे. कोण चुकतंय? कुठे चुकतंय?
परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी सगळ्यांचे लाडके असतात, आदर्श समजले जातात. शाळेला, पालकांना त्यांचा खूप अभिमान असतो. ते सगळ्यांचे आवडते असतात, हे वास्तव आहे, हे मुख्याध्यापक या नात्याने मलाही ठाऊक आहे. पण या मार्कांच्या आड दडलेलं एक आणखी वास्तव आहे, जे आपल्याला दिसतं; पण पाहायचं नसतं आणि तेच आपण मुलांच्या मनावरही बिंबवत असतो की, मार्क खूप महत्त्वाचे असतात. मुलं शाळेत येतात, शिकतात, परीक्षा देतात, पुढच्या वर्गात जातात. आपण मोठी माणसं डिग्री, नोकरी, पैसा, लग्न, मुलं, घर, गाडी हे सेटल होणं खूप महत्त्वाचं समजतो. यासाठी मार्क, अजून मार्क, खूप मार्क, अगदी हंड्रेड मार्क हवेत हे वाटत राहतं. पण हे मार्क मिळवण्याची परीक्षा मात्र मुलांच्या स्मरणशक्तीला तपासणारी आहे, हे कटू सत्य आहे आणि ते कोणालाही नाकारता येणार नाही.

मार्कांचा विचार करताना शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षणासारखंच मुलांना त्यांच्या आवडत्या विषयात रस असणं, त्यात प्रावीण्य असणं, त्यांच्यातली कला, साहित्यिक गुणवत्ता, अभिनय, खेळ हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी ते मार्क देणारं असो वा नसो. दुसऱ्याशी आदराने वागणं, मदत करणं, हजरजबाबी असणं, मत पटवून देणं, वाद सोडवणं, निर्णय घेणं, सगळ्यांना धरून चालणं, लहानांचा सांभाळ करणं, आजारी माणसाची शुश्रुषा करणं, घरातली, बाहेरची कामं करणं हेही मार्क्स इतकंच महत्त्वाचं आहे. मार्क हे एक स्लो पॉयझन आहे, जे आपला आपल्याच मुलांबाबतचा दृष्टिकोन तयार करत असतं. यश, मार्क हे आपल्याला, मुलांना आनंद देतात, हे जरी खरं असलं, तरी मुलांना मोजण्याची मार्क हीच एकमेव फूटपट्टी नव्हे.

शिक्षणाचा मूळ हेतू मुलांना साक्षर करणं, सुशिक्षित करणं असला, तरी पालकांचं उद्दिष्ट त्याला सुसंस्कृत माणूस बनायला मदत करणं हेच असतं, हे लक्षात ठेवायला हवं. मुलं म्हणजे मार्क नव्हेत, त्यापलीकडे त्यांचं असं एक जग आहे. पुस्तक वाचनाबरोबरच माणसांची मनं वाचणं, कविता, प्रश्नोत्तर, व्याख्या म्हणून दाखवण्याबरोबरच इतरांशी संवाद करणं, वर्गात शिकवलेलं ऐकताना दुसऱ्याचं मत समजून, ऐकून घेणं, आपलंही मत मांडता येणं, लिहून शब्दांत व्यक्त होणं, चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवणं हे खरे मार्क आहेत. किती मार्क्स मिळाले, यावरून मूल कसे आहे, हे ठरवणं म्हणजे judging the book by it’s cover असंच झालं. अंकांवरून बुद्धिमत्तेबाबत बोलण्यापेक्षा ती अंतरंगावरून ठरायला हवी. अखेरीस एक गमतीची गोष्ट लक्षात घ्या की, ६६ टक्के मार्क मिळवणारे मोठे बिझनेसमन होतात आणि ९६ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांच्याकडे नोकरी करतात.

आपण मुलांना शाळेत घालतो, शिक्षण देतो ते श्रीमंत होण्यासाठी नव्हे, तर आनंदी राहण्यासाठी. वस्तूंची किंमत शिकण्यासाठी नाही, तर त्यांची व्हॅल्यू समजून घेण्यासाठी, याचा विचार करायला हवा. मुलांनी भरपूर मार्क मिळवले म्हणजे ते स्कॉलर असं जेव्हा आपण म्हणतो, याचा अर्थ आपण स्कॉलर होणं महत्त्वाचं समजतो आणि मुलांना मार्कांवरून तोलतोय. पण या मार्कांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ते चिरडून तर जात नाहीत ना, हे पाहणं आणि वास्तव अपेक्षा करणं आपल्याला जमायलाच हवं. मुलं म्हणजे मार्क नव्हेत, तर ते तुम्ही आई-बाबांनी या जगात आणलेली ती एक सर्वात सुंदर कलाकृती आहे.

Recent Posts

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही…

48 mins ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, योग सौभाग्य, चंद्र…

3 hours ago

लोकलमधील जीवघेणी गर्दी; प्रवाशांचे मृत्यू वाढले

रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस या खासगी आस्थापनेत प्रवासी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच शहरी व निमशहरी…

6 hours ago

IND vs ENG: अक्षर, कुलदीपची कमाल, इंग्लंडला नमवत टीम इंडिया दिमाखात फायनलमध्ये

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला…

6 hours ago

‘मुंबई’चे कराची होणार का?

डॉ. कर्नल (नि.) अनिल आठल्ये, ज्येष्ठ अभ्यासक पाकिस्तानचे कट्टर समर्थक, हिंदूंच्या कत्तलीतील सहभागी आणि बांगलादेशच्या…

6 hours ago

अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प

अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात आशावाद मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७…

7 hours ago