Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ST Bus : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रशासनाने राबवली 'ही' विशेष मोहिम

ST Bus : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रशासनाने राबवली 'ही' विशेष मोहिम

आता एसटी पाससाठी रांगेत ताटकळावं लागणार नाही


मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Bus) बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीतून विद्यार्थ्यांना ६६ टक्के सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ ३३ टक्के पैसे भरुन पास काढता येत असतो. तर विद्यार्थीनींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास (ST Bus Pass) मिळत असतो. मात्र हा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी केंद्रावर भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. यंदा विद्यार्थ्यांना बस पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. एसटी प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी योजना आखली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना थेट शाळेतच पास वितरित करण्यात येणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना एसटी केंद्रावर रांगेत उभे राहून किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घ्यावे लागत. मात्र यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत उभे न राहता पास थेट हातात येणार असल्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.



एसटीने केला हा बदल


एसटी महामंडळाला शाळा - महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देणार आहे. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जून पासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

Comments
Add Comment