घराचं घरपण बाबा…

Share

माेरपीस – पूजा काळे

रोज नव्या कर्तव्याची
ज्याला आहे जाण
बाबा भरून काढतो
आयुष्याचे पान.

झिरो ते हिरोपर्यंतच्या साऱ्या भूमिका यथावकाशपणे साकारणारा घरातील नटसम्राट म्हणजे बा, ज्याच्या साधेपणानं घराला ऐश्वर्य लाभतं. वाघाचं काळीज असलेल्या बापाचं मोल अनमोल असं आहे; ते ज्याला कळतं त्याचा पुढील मार्ग सुखकर होतो. बाप नावाचं बाळकडू ज्याला लाभतं, तो या जगातील सर्वात सुखी माणूस म्हणता येईल. काचेचं दोलक उन्हात धरलं असता, डोळ्यांस जसे सप्तरंग दिसतात, त्या सारखाचं वरवर रंगरंगोटीचे मुखवटे जडवलेला बाप अंतःकरणात मायेशी नाळ जोडणारा शासक असतो. त्याचं वरवरचं दिसणं म्हणजे आपण म्हणू काट्यातल्या फणसासारखं जरी असलं तरी आतला मऊशार गर ही त्याची खासियत सर्वस्वी उदारमतवादी विचारांची पुस्ती जोडणारी आहे. शांत डोहातल्या नितळ पाण्याची उपमा बाबाला देऊ केली तरी, त्यात उठणाऱ्या तरंगाची लय पाहिली आहे का, कोणी जवळपास कोणालाही दिसत नाही ती. अन्यथा तिला समजून घ्यायला आपण तोकडे पडत आहोत. सहजा-सहजी बाप कळलायं का कुणाला? याचं उत्तर अजिबात नाही असंच देता येईल. अखेरच्या क्षणापर्यंत कळत नाही तो बाप. त्याच्या खंबीर खांद्याआड सुरक्षित असलेले आपण अनभिज्ञ राहातो. त्याचे उदात्त भाव कळायला बरीच वर्षे वाया घालवतो.

उत्तम रचनाकार आपल्या रचनेत बाबा या शब्दाशी येऊन थांबतात. कसं लिहावं हा प्रश्न नसतो; परंतु बाबा या एका शब्दाला कवेत घेण्याइतपतची प्रतिभा सापडत नसावी. त्याची महती सांगणारी उपमा, विशेषण, यमक यांची वानवा भासावी इतकं हे गहन वलय असतं. तेव्हा काय लिहावं या मर्यादा नित्य लेखणीला भिडत असाव्यात. मराठी साहित्यात आई विषयीच्या रचना सातत्याने पाहायला मिळतात. शब्दात पकडलं जावं इतकं बाबा शब्दाचं माहात्म्य छोटं नाही. ते जाणवण्या इतकी खोल विचार उडी आपली नसावी कदाचित. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला यात बाबा विषयीचे पारिवारिक कर्तव्य स्पष्ट होतं. जगत नाही तो कधी स्वतःसाठी. समर्पण, कष्ट आणि त्याग यांच्या आहुतीत स्व जीवनाचा कदापि स्पर्श होत नसावा त्याला. म्हणून साधेपणाच्या तेजस्वी दीपज्योतीनी उजळून निघतो तो.

आनंदाच्या बळकटीसाठी विवेकाची कास धरणारा, कुटुंबवत्सल असा बाप नावाचा माणूस दुसऱ्यांसाठी सुखद पायवाट निर्माण करतो तो आपल्या सच्चेपणाने. चढ-उताराची साखळी पार करताना आयुष्यात जेरीस आणणारे प्रसंग कोरतो तो स्वतःच्या छाताडावर. व्रणाची पर्वा न करता इमान राखतो कर्तव्याशी. कर्त्या पुरुषाला रडणं शोभत नाही, म्हणून रात्रीच्या गर्द काळोखात अश्रू टिपत बसलेला बाप दिसत नाही कुणाला. दैवगतीनं एक व्रत सतत त्याच्याही आयुष्याला जोडलेलं असतं. तरीही अधिकाराने नेहमीच्या जगण्याचे नियम धाब्यावर बसवत नाही तो कधी. बाबा समजायला मला स्वत:ला खूप काळ लोटला आहे. मला कळलेला बाबा कागदावर उतरवताना कागद भरून येतो, पण त्याच्या विषयीच्या भावना संपता संपत नाहीत. या अशा… स्थित्वाचा मौलिक धडा, समजावत बाबा गेला. लेकी जग आहे बेरकी, मोठं होता कळेल तुला | आज तूच नाहीस गड्या, बीजनवांकुर बघाया. काळीज भेदले असते, या डोळ्यांनी जग दावाया | मी लिहीत जाते, तरी बाप संपत नाही. त्याच्या अतिसूक्ष्मतम अस्तित्वाचं वरदान मागे असल्याचं जाणवत राहातं मला सदोदित.

बाबा तुला कळतं का रे मनातलं, कधीतरी बोल अन् खोल गुपित स्वतःतलं. तुझा चेहरा पाहून काळीज तुटत रे आतलं, कधीतरी बोल अन् खोल गुपित स्वतःतलं.

तो उठतो, पडतो, धडपडतो, तरीही लढतो स्वकर्तृत्वावर. दशा घेऊन दिशा देतो आपणास. धर्म पाळून कर्माची गोड फळं टाकतो आपल्या पदरात आपल्यापेक्षा चार बुक कमी शिकला म्हणून बाप नसतो अडाणी, आपलं बोट पकडून अनुभवाची शिदोरी देतो आपल्याला आणि मोकळं करतो स्वत:ला. पण अंति उरत नाहीत त्याच्या कुठल्याही इच्छा. कायम सोबत करतात त्याच्या सदिच्छा. देवा तुझ्या गाभाऱ्यात, निरंजन तेवत आहे. आयुष्याचं इंद्रधनू माझा बाबा पेलतो आहे।

चेहऱ्यावरच्या रेषा ढळू दिल्या नाही कधी, हृदयातला मर्म भाव कळू दिला नाही कधी. मोडला नाही कणा त्याचा अजूनही लढतो आहे, आयुष्याचं इंद्रधनू माझा बाबा पेलतो आहे. शिस्तीचे धडे तुझ्याकडून गिरवले, जगण्याच्या परीक्षेत पास होऊन दाखवले. डोक्यावर ठेवून एक हात अनेक वर्षे उभा आहे. आयुष्याचं इंद्रधनू माझा बाबा पेलतो आहे. मंडळी बाप होणं सोपयं, पण बा कळणं कठीण आहे. सुखी सदऱ्याचं दुसरं नाव बा असावं. कुठलाही व्रण, डाग त्याच्या सदऱ्यावर नसलेला. पांढऱ्या शुभ्र सतेज कापडात शोभणारं बा नावाचं वादळ सदैव आपली सोबत करेल; परंतु आपल्या विचारांमधली त्याच्या विचारांची गरज वेळ, काळ आल्यावर ज्याची त्याला कळली की झालं! पण त्याकरिता त्याच्यासारखं होणं जमायला हवं. त्याच्यासारखं जगायला हवं. आपण घडलो. आता पुढची पिढीच सांगेल. ती घडतेय की बिघडतेय ते. यातून काहीही चांगलं झालंच तर त्या बापाचा जन्म सार्थकी लागेल एवढं मात्र खरं.

कृतज्ञतेची भावना

सुनोरा हिने फादर्स डेच्या सेलिब्रेशनला सुरुवात केल्यानंतर अन्य मंडळीही या प्रकारे सेलिब्रेशन करू लागले. १९१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यानी ‘फादर्स डे’ साजरा करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली. १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करावा, अशी घोषणा केली. तेव्हापासून जगभरात जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

आपल्या मुलाला घडवण्यामध्ये वडिलांचा मोठा वाटा असतो. पण आपण कधी त्यांना थँक्यू म्हणत नाही. आपल्या बाप माणसाबद्दल मनातील भावना व्यक्त करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळे समाधान दिसून येईल. आई-वडिलांच्या उपकारांची परतफेड कधीच करता येत नाही. पण तुम्ही त्याच्या कष्टाचं चीज झालंय हे दाखवण्यासाठी त्यांच्यावरील प्रेमाची भावना दाखवून दिली, तर त्यांना भरून पावल्यासारखं होईल. तुम्ही या दिवशी वडिलांसोबत खास बेत आखू शकता. आपली आवड जोपासणाऱ्या बाप माणसाला काय आवडते ते समजून घेऊन तुम्ही वडिलांना काहीतरी सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. थोडक्यात तुमच्या मनातील त्यांच्याबद्दलची प्रेमाची भावना दाखवून देता येईल, कोणतीही गोष्ट तुम्ही यादिवशी करू शकता.

बाप हा फणसासारखा बाहेरून काटेरी आणि आतून गोड असतो, असे म्हणतात. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या वडिलांसोबतचे नाते घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. प्रत्येक वर्षी फादर्स डेच्या दिवशी तुम्ही या दिवसाचे मेगा सेलिब्रेशन कराच. पण तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस त्याचा आहे. त्यामुळे चुकूनही त्याला विसरू नका.

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

58 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

2 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago