प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
आमच्या बाबांकडे काही मित्र यायचे, त्यातील एका मित्राचे नाव सुरेश कावळे काका. आमचे अत्यंत लाडके काका. कारण ते एकमेव काका असे होते की कसे आहात? सध्या नवीन काय शिकताय? शाळेतली प्रगती कशी आहे? अशा विषयांवर बोलून, मग बाबांशी गप्पा करायचे. आम्ही खूप लहान असूनसुद्धा आम्हाला स्वतःचे महत्त्व वाटायचे. दरम्यान बाबा खूप लहान वयात गेले आणि कावळे काका आमच्या घरी यायचे जवळजवळ बंदच झाले. त्या काळात काही फोन वगैरे नव्हते, त्यामुळे तसे संबंध टिकवून ठेवणे कठीणच होते आणि त्याचे फारसे कारणही नव्हते.
एका सामाजिक समारंभासाठी मी आणि माझा नवरा गेलो होतो. दोन-तीन महिन्यांपूर्वीच आमचे लग्न झाले होते आणि समोर कावळे काका बसलेले दिसले. मी लगेच यांचा हात धरून, त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना नवऱ्याची ओळख करून दिली आणि अगदी मनापासून म्हटले, “काका तुम्ही सध्या कुठे आहात, कसे आहात, याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे, तुम्हाला लग्नाला बोलवता आले नाही.”
ते म्हणाले, “काही हरकत नाही. आता येईल ना केव्हा तरी घरी.”
मलाही बरे वाटले.
“चल पाया पडू आपण दोघे.” असे बोलून नवऱ्याला माझ्यासोबत पायाही पडायला लावले. नंतर तिथे माझ्या आणि याच्या ओळखीची बरीच माणसे होती. सगळ्यांशी गप्पाटप्पा करून, घरी जाण्याच्या विचाराने आम्ही दोघेही बाहेर पडत होतो आणि नेमकेच त्या फाटकापाशी कावळे काका उभे होते. मी त्यांना म्हटले,
“काका कुठे जात आहात?”
तर म्हणाले, “एक काम आहे चेंबूरला तिथे जात आहे.”
मी म्हटले, “चला आम्ही तुम्हाला सोडतो.”
ते म्हणाले, “काहीच हरकत नाही.”
त्या कार्यक्रमांमध्ये माझी आईसुद्धा आलेली होती. मी या म्हटले, “अरे मी आता आईला घेऊन येते, तू काकांना तुझ्या बाजूच्या सीटवर बसव.” थोड्या वेळाने मी आईला घेऊन परत आले. पाहते तर काय… कावळे काका यांच्या बाजूला बसले होते आणि मागच्या सीटवर दोन स्त्रिया, दोन पुरुष आणि त्यांच्या मांडीवर एक वर्ष ते पाच वर्षांच्या दरम्यानची चार मुले. मी हादरलेच. काकांनी उत्साहाने ओळख करून दिली. “मुलगा, सून, मुलगी, जावई आणि ही चार नातवंडं.”
मी आणि आई कुठे बसणार, या विचारात मी असताना, हा म्हणाला की, “रिक्षाने या आणि त्याने गाडी सुरू केली.” आम्ही दोघींनी रिक्षा पकडली. आईने मला सोसायटीच्या दारात उतरवून, तीच रिक्षा घेऊन, ती घरी गेली. एक-दीड तास झाला, तरी हा घरी पोहोचला नाही. तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी सेकंड हँड, पहिलीच गाडी घेतली होती. अॅम्बेसेडर गाडी होती.
आईला पहिल्यांदाच आमच्या गाडीत बसवणार होतो. हा घरी आला तो चिडूनच. त्याने सांगितलेली कथा अशी की, काका आतमध्ये चढल्यावर त्यांनी यांना आत चढायला सांगितले. अगदी प्रेमाने त्यांची ओळखही करून दिली. त्यानंतर तुम्ही दोघी आलात. मी गाडीत चढल्यावर, त्यांना चेंबूरला कुठे उतरणार असे विचारल्यावर, ते म्हणाले की, “आता गाडी आहेच, तर तू आम्हाला घाटकोपरपर्यंत सोड म्हणजे आम्ही ट्रेनने ठाण्याला जाऊ, चेंबूरचे काम मी परत केव्हा तरी येऊन करेन.” मी मुकाट्याने त्यांना घाटकोपर स्टेशनपर्यंत सोडले. गाडी चालू केली, तर ती गाडी चालूच होईना. गाडी त्याच जागी बसली. ते नऊ जण मस्त चालत निघून गेले. केव्हाच ठाण्याला उतरून, त्यांच्या घरीदेखील पोहोचले असतील.
मी घाटकोपर स्टेशनच्या बाहेरच. रिक्षावाले-टॅक्सीवाल्यांनी मदत केली. गॅरेजमधून एक माणूस घेऊन आलो. गाडी रिपेअर केली आणि घरी आलो. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, त्या काकांना जाऊ द्या, त्यांच्यासोबत असलेल्या चार प्रौढ माणसांनाही कळले नाही का, की गाडी कोणाची आहे आणि कोण जातंय त्या गाडीतून आणि कशा तर्ऱ्हेने? काकांचे वजन साधारण १२० ते १३० किलोच्या दरम्यान असावे! ही माझ्या आयुष्यात घडलेली सत्यघटना आहे, याची दीर्घ विनोदी कथा होऊ शकते, पण असो!
या गोष्टीचा मथितार्थ काय? आपण चांगल्या अर्थाने लोकांना मदत करायला जातो, त्याचा कशा तर्ऱ्हेने लोक गैरफायदा घेतात. म्हणूनच कोणत्या माणसाला कधी आणि किती मदत करावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय आपल्या मदतीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आपल्याला राग दर्शवता आला पाहिजे, हेही महत्त्वाचे आहे! फटकारता आले पाहिजे.
मदत घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनी यातून काय तो बोध घ्यावा!
pratibha.saraph@ gmail.com