
खासदार नारायण राणे यांचा विश्वास
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत जशी केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली. तशीच राज्यातही पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार आहे. कोकणातील उबाठा शिवसेना संपविली. उबाठाचे सर्व आडवे झाले. पूरुन उरलो. आता कोकणात कोणाला पुन्हा शिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना दिला आहे.
कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी संदीप कुडतरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार, पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार, पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार, सीवर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार आणि रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार, असा विश्वास नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चिपी विमानतळावरून विमानांचे नविन रुट चालविणार, समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार, या ट्रेनचा सर्व आराखडा तयार आहे. त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लवकरच निर्णय घेणार आहोत, असेही खासदार राणे यांनी सांगितले.
मतदार आणि जनतेचे ऋण व्यक्त करतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल गर्व वाटतो. प्रथम उमेदवारी दिली, त्याबद्दल पक्षाचे, नेत्यांचे, आणि विजय मिळाल्याबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानतो. भाजपाचे सर्व नेते, भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरीचे आमदार आणि मंत्री उदय सामंत, सावंतवाडीचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर, चिपळूणचे आमदार निकम, संदीप कुडतरकर यांचे त्याचप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे उमेदवारी मिळाली आणि विजयासाठी सहकार्य मिळाले. त्यांचेही मनापासून आभार मानतो. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हे दिवसरात्र मतदारसंघात फिरले. सौ. नीलम राणे यांनी खूप मेहनत घेतली. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. त्यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यांचेही आभार मानतो. पत्रकारांचे चांगल्या बातम्या दिल्याबद्दल आभार मानतो. निवडणूक काळात संयमी वागलो. विरोधकांनी मला उसकावण्याचा प्रयत्न राग आणण्याचा प्रयत्न केला मात्र मी संयमाने घेतले.त्यामुळे मला विजय मिळाला. हा विजय माझे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून मिळालेला असे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सर्व विधानसभेच्या जागा जिंकणार
उबाठा सेनेने आयुष्यभर मुस्लिमविरोधी काम केले. मातोश्रीवर मुस्लिम समाजाला काय बोलतात तो शब्द मी येथे उल्लेख करू शकत नाही. असे आज उद्धव मिया भाई झाले. मात्र कोकणातील मुसलमान आमच्यासोबत आहेत आणि राहतील. भारत एकसंघ रहावा म्हणून आम्ही सर्वजण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असे नारायण राणे म्हणाले. कुडाळसह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार असा विश्वासही यावेळी खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील कामांना खासदार नारायण राणे देणार प्राधान्यक्रम
रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडून आहेत आणि त्यासाठी मी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. रत्नागिरीमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणार. रत्नागिरीची पाणी टंचाई, चिपळूणची पूरस्थिती, विमानतळ, रोजगार व पर्यटन विकास या बदल मी प्राधान्याने काम करणार आहे, असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग चे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. दोन्ही जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनी खूप काम केले. त्यांनीच मला विजय दिला. त्यांचा आणि येथील मतदारांचा मी आभारी आहे, असे ते म्हणाले.