मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जास्त जागा मिळाल्या तर महायुतीला (Mahayuti) तुलनेने कमी जागा मिळाल्या. असं असलं तरी ठाकरे गटातून (Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कमी व्हायचे नाव घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात (Thane) उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उमेदवाराचा सहज पराभव झाला. या पराभवाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाण्यामधून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश पार पडल्यामुळे तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरत यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी नेते यावेळी उपस्थित होते. मीरा भाईंदर शहरात आणखी दोन माजी नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक विश्वासू शिलेदार ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.