
गरजेच्या वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्यांच्या खिशाला फटका
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) सर्वसामान्यांना महागाई (Inflation) कमी होईल अशी आशा होती. मात्र, त्यांच्या या आशेवर पाणी फिरलं असून साध्या गरजेच्या गोष्टींचेही भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. दूध (Milk) ही नेहमीच्या वापरातील गोष्ट महाग होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अमूल कंपनीने (Amul company) दुधाचे दर वाढवले. यानंतर आता पराग कंपनीनेही (Parag company) दुधाचे दर वाढवल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
एका बाजूला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk Farmers) दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. अमूल (Amul) आणि मदर डेअरीनंतर (Mother dairy) आता परागनेही दुधाच्या दरात (Parag Milk Price) वाढ केली आहे. परागने दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाची किंमत आता प्रतिलीटर ६६ रुपयांवरुन ६८ रुपयांवर गेली आहे.
परागच्या दोन्ही एक लिटर व्हरायटी पॅकमध्ये प्रत्येकी २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पराग गोल्ड १ लीटरची किंमत ६६ रुपयांवरून ६८ रुपये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पराग दुधाचे नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत.
परागच्या कोणत्या दुधाला किती दर?
पराग डेअरीचे जीएम, विकास बालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, परागच्या बाजारात उपलब्ध असलेल्या १ लीटरच्या दोन्ही पॅकच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, अर्धा लीटर पॅकमध्ये प्रत्येकी एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे पराग गोल्ड अर्धा लिटरची किंमत ३३ रुपयांवरुन ३४ रुपये झाली आहे. अर्धा लिटर पराग मानक दुध आता ३० रुपयांऐवजी ३१ रुपयांना झाले आहे. याशिवाय अर्धा लिटर टोन्ड दुधाचा दर २७ रुपयांऐवजी २८ रुपये झाला आहे. २ जून रोजी अमूल आणि इतर दूध उत्पादक कंपन्यांनी दरात वाढ केली होती. त्यानंतर आता परागनेही आपल्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. एका बाजूला अतिउष्णतेमुळे दुधाचे उत्पादनही कमी होत आहे. अशातच आता दुधाच्या दरात वाढ झाली आहे. पराग दररोज सुमारे ३३ हजार लीटर दुधाचा पुरवठा करते.