Monday, March 24, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सKailash Waghmare : गावच्या रांगड्या मातीची कथा ‘गाभ’

Kailash Waghmare : गावच्या रांगड्या मातीची कथा ‘गाभ’

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

कैलाश वाघमारे याने अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. ‘तानाजी दी अनसंग वॉरियर’ या हिंदी चित्रपटात चुलत्या ही लहानशी भूमिका करून देखील तो प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. ‘गाभ’ हा त्यांचा मराठी चित्रपट येतोय.

जालना जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. आईवडील अशिक्षित, बांबूच्या टोपल्या व झाडू बनविण्याचे काम करीत असत. शिक्षणामुळे समाजात आदराचे स्थान मिळते, याची जाणीव झाल्याने, कैलाशने शिक्षणाची वाट धरली. मराठीतून त्याने एम. ए. केले. एका गाण्याच्या कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. त्याला नंतर शाळेच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात गाण्याची संधी दिली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. कॉलेजमध्ये असताना त्याला शिक्षकाने एका गाण्याच्या स्पर्धेला घेऊन गेले होते. परंतु तेथे त्याला सहभागी करून घेतले नाही, कारण त्याच्यासोबत संगीताला संगीत देण्यासाठी कोणी देखील नव्हते. त्यामुळे त्याला घेऊन गेलेले सर नाराज झाले. मात्र त्यानंतर त्यांनी त्याला अनेक कार्यक्रमांत संधी दिल्या. त्यामुळे त्याचा रंगमंचावरील आत्मविश्वास वाढत गेला.

युवक महोत्सवामध्ये त्याने भाग घेतला. कथाकथन, कवितेच्या स्पर्धेत तो भाग घेऊ लागला. त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळू लागली. ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्र हा विभाग सुरू केला होता. त्यामध्ये त्याला प्रवेश मिळाला. पुढे खूप संघर्षानंतर त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. संभाजी भगत यांचं शिवाजी अंडग्राऊंड इन भीम नगर मोहल्ला या नाटकात त्याने भूमिका केली. मिलिंद कांबळे ही त्याची मध्यवर्ती भूमिका होती. हे नाटक खूप गाजलं. त्याचे आठशे प्रयोग झाले. त्यानंतर त्याने दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या ‘माझी शाळा’ या मालिकेत काम केले. या मालिकेचा एक भाग पाहून एका दिग्दर्शकाने त्याला पहिल्या चित्रपटात घेतले. त्या चित्रपटाचे नाव होते ‘मनातल्या उन्हात.’

‘गाभ’ हा चित्रपट येतोय, त्यामध्ये दादू नावाची व्यक्तिरेखा तो साकारत आहे. तो अंतर्मुख असतो. स्वतःचा विचार करणारा असतो. काही व्यक्ती स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालून, दुसऱ्याला दोषी ठरवत असतात, अशा विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. गाभ म्हणजे गर्भ पोटात जो चुकीच्या धारणांचा गर्भ वाढत असतो, त्याचा गर्भपात करून मोकळेपणाने जगले पाहिजे. आपल्या समाजात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. प्राणिमात्रांमध्ये मात्र रेड्याची संख्या म्हशीपेक्षा कमी आहे. ज्या व्यक्तीकडे रेडा आहे, तो व्यक्ती कसा वागतो व आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. गावच्या रांगड्या मातीच्या पार्श्वभूमीवर गाभची कथा आहे.

विद्यापीठ नावाचा त्याचा एक सिनेमा व दोन हिंदी सिनेमे येणार आहेत. त्याने लिहिलेला व अभिनय केलेला ‘खालिद’ नावाचा सिनेमा येणार आहे. त्याच्या भावी वाटचालीस व येणाऱ्या चित्रपटासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा !

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -