राजरंग – राज चिंचणकर
अनेक गाजलेल्या नाट्यकृतींसह विविध नाट्यसंस्थांनी मराठी नाट्यसृष्टी सजीव ठेवली आहे. यातल्या काही नाट्यसंस्था प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या, तर ज्या संस्थांच्या भाळी हे भाग्य नव्हते; अशा काही संस्था मात्र विंगेत चाचपडत राहिल्या. यात स्वतःचा खिसा हलका करून रंगभूमीवर इमानेइतबारे घाम गाळणारे काही रंगकर्मी आहे. त्यात समाधान मानत रंगभूमीची सेवा मात्र निष्ठेने करत राहिले आणि आजही करत आहेत.
व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळत नसेल, तर मुंबई-पुण्याप्रमाणे स्वतःच आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यावसायिक नाट्यसंस्था सुरू करावी, या उद्देशाने एक नाट्यसंस्था नाशिकच्या रंगभूमीवर उदयाला आली. म्हणायला व्यावसायिक नाट्यसंस्था; पण बराचसा हौशी मामला अशा एकंदर स्थितीत संस्थेला अनेकांची साथ मिळत गेली आणि ‘रंगमंच’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. या घटनेला यंदा तब्बल पन्नास वर्षे झाली आहेत. मात्र ‘नाट्यसेवा’ हा एकच ध्यास घेतलेले यातले रंगकर्मी, वयाची सत्तरी ओलांडली तरी मनाने अजूनही ‘तरुण तुर्क’ असून आजही रंगभूमीवर कार्यरत आहेत.
‘रंगमंच-मुंबई’ अशी ओळख प्राप्त केलेल्या या नाट्यसंस्थेने गेल्या ५० वर्षांत तब्बल ३० नाटकांचे संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो प्रयोग गाजवले आहेत. रंगभूमीची अखंड सेवा करता यावी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी ही संस्था सुरू केली. कोणत्याही प्रकारचे बीज भांडवल नसतानाही मराठी नाट्यरसिक, सहकलाकार, तंत्रज्ञ व मित्रांच्या साथीने संस्थेने ५० वर्षांची प्रदीर्घ वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३००वा राज्याभिषेक दिन म्हणजे २ जून १९७४ या दिवशी ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकाद्वारे ‘रंगमंच’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
प्रा. मधुकर तोरडमल यांच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचा संयुक्त पाच हजारावा प्रयोग साक्षात त्यांच्याच उपस्थितीत सादर करण्याचे भाग्य या संस्थेला लाभले आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे प्रत्यक्ष रायगडावर दोन वेळा प्रयोग करण्याचे भाग्यही या संस्थेच्या गाठीशी आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची ‘नाट्यसंपदा’, डॉ. पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ‘रंजन कलामंदिर’, मोहन वाघ यांची ‘चंद्रलेखा’ या संस्थाही ‘रंगमंच’च्या पाठीशी वेळोवेळी उभ्या राहिल्या. त्यांच्यासह ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘मनोरंजन-पुणे’, ‘रसिकमोहिनी’, ‘कौस्तुभ थिएटर’ आदी संस्थांनीही ‘रंगमंच’ला आधार दिला.
५० वर्षांच्या या नाट्यप्रवासात निरपेक्ष साथ देणाऱ्या साथीदारांच्या मदतीची जाण संस्थेने ठेवली आणि हे जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी ‘केशव स्मृती कृतज्ञता पुरस्कार’ या संस्थेने सुरू केले. त्यासोबतच सामाजिक भान ठेवत, एड्स या रोगाची भीषणता शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावी यासाठी ‘या चांगल्या घरात असं झालंच कसं?’ या नाटकाचे शेकडो प्रयोग, ‘नाट्यसंपदा’ आणि ‘रंजन कलामंदिर’च्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रभर केले.
‘रंगमंच’ नाट्यसंस्थेच्या उभारणीत आणि नंतरच्या काळात उपेंद्र दाते यांना अनेक जणांनी खंबीरपणे साथ दिली. ज्येष्ठ रंगकर्मी मोहन साटम, राजन पाटील, प्रमोद पवार हे तर संस्थेचे आधारस्तंभच आहेत. पन्नास वर्षांचा संस्थेचा हा प्रवास खडतर होता; परंतु त्यावेळी संस्थेला तारणारी मंडळीही बरीच होती. ही यादी अक्षरश: शेकडो व्यक्तींच्या घरात जाऊन पोहोचणारी आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘मला काही सांगायचंय’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गरुडझेप’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘नटसम्राट’, ‘तुझे आहे तुजपाशी’ या आणि अशा अनेक लोकप्रिय नाट्यकृती ‘रंगमंच’ नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणल्या आहेत.
यंदा संस्थेच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण महोत्सवी आनंद सोहळा’ आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात ‘केशव स्मृती कृतज्ञता पुरस्कार’ काही रंगकर्मी आणि नाट्यसंस्थांना प्रदान करण्यात आला. ‘मामा तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार २०२४’ हा मानाचा पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘आत्मकथा एका नाट्यसंस्थेची’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत, ‘रंगमंच’ संस्थेच्या ५० वर्षांतल्या नाटकांच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय गोखले, ज्ञानेश महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
‘रंगमंच’ नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा उपेंद्र दाते यांनी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या असल्या, तरी त्यांनी रंगभूमीलाच सर्वार्थाने वाहून घेतले आहे. रंगभूमीची अखंड सेवा करता यावी म्हणून त्यांनी ‘रंगमंच’ ही संस्था सुरू केली खरी; परंतु काही वर्षांपूर्वी संस्था चालवण्यासाठी कर्ज आणि उसनवारीचा मार्ग त्यांना अवलंबावा लागला. रंगभूमीवर कितीही प्रेम असले तरी बदलत्या काळाच्या ओघात, मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या निर्मात्याला नाट्यसृष्टीत तग धरणे अवघड होऊन बसते आणि त्याचा फटका ‘रंगमंच’ या संस्थेलाही बसला.
उपेंद्र दाते यांनी आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. यापुढे ‘रंगमंच’ नाट्यसंस्थेचे नवीन नाटक कधी येईल, याची रसिक वाट पाहत आहेत. याबाबत बोलताना उपेंद्र दाते म्हणतात, “नवीन नाटकाची निर्मिती कधी करू, ते सांगता येत नाही. पण कुणी आयोजित केले, तर ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘नटसम्राट’ या नाटकांचे प्रयोग आम्हाला करता येतील. तसेच ‘नटसम्राट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांचे माझे एकपात्री प्रयोग सुरूच आहेत. जोपर्यंत हातपाय हलत आहेत, नीट बोलता येत आहे, स्मरणशक्ती फार दगा देत नाही आणि जोपर्यंत रसिक मायबाप ‘दाते आता पुरे’ असे म्हणत नाहीत तोपर्यंत रंगमंचावर व नंतर मनातल्या रंगभूमीवर नाटक एके नाटक करतच जगायचे आहे.”