नवी दिल्ली : भारतातील काही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि बंगळुरू शहरात काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. ही पाण्याची समस्या फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांत (Water Crisis in World) निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, तुर्की, ब्रिटन, इजिप्त, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या देशात पाण्याच्या दुष्काळाचा (drought) धोका निर्माण झाला आहे.
सध्या राजधानी दिल्ली शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाण्यासाठी टँकर समोर रांगा लागत आहेत. याआधी मार्च एप्रिल महिन्यात बंगळुरूमध्ये अशीच पाणी टंचाई निर्माण झाली होती.
मेक्सिकोत २० टक्केच पाणीपुरवठा
तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरात जवळपास दीड कोटी लोक राहतात. येथील जलस्रोतात ३० टक्के पाणी कमी झाल्यानंतर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी मध्ये मोठ्या मुश्किलीने फक्त २० टक्के लोकांना काही वेळासाठी पाणीपुरवठा करता येतो. वाया जाणाऱ्या पाण्याचे रीसायकलिंग करून येथे पाण्याचा पुरवठा करावा लागतो.
केपटाऊनमध्ये पाणी संपण्याचा धोका
दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन मध्ये पाणी संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील धरणात पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
कैरोत पुढील वर्षात पाणी टंचाई
इजिप्तची राजधानी कैरो मध्ये संपूर्ण देशाच्या ९७ टक्के पाणी आहे. तरी देखील येथील लोकांना पाण्याची कमतरता जाणवत असते. संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की २०२५ पर्यंत येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.
बेकायदेशीर विहिरींनी जकार्तात टंचाई
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये बेकायदेशीर पद्धतीने विहिरींचे खोदकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे येथील पाणी पातळी खालावली आहे. वर्ल्ड बँकेचे म्हणणे आहे की जकार्ताचा ४० टक्के हिस्सा समुद्राच्या पातळीच्या खाली आहे.
वृक्षतोडीने मेलबर्नला पाण्याचे संकट
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात पाण्याचे संकट वेगाने वाढत आहे. येथील जंगल वेगाने कमी होत चालल्याने आगामी काळात शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. ऑस्ट्रेलियात जंगलांना आगी लागण्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. त्यामुळेही येथील वनसंपदा वेगाने घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लंडन शहरातही पाण्याची टंचाई
ब्रिटनची राजधानी लंडन शहरात २०२५ पर्यंत पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. ग्रेटर लंडन अथॉरिटीने सांगितले की २०४० पर्यंत येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.