पाऊस आला… दरडी कोसळल्या, पर्यटकांनो सावधान!

Share

पावसाळा सुरू झाला की, दरडी कोसळणे, डोंगरांचा भाग ढासळणे, नदी-नाले, ओढे यांना पूर येणे, पुलावरून पाणी वाहणे, रस्ते खचणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. नैसर्गिक आपत्तीसोबत चालकांना असलेले वेगाचे आकर्षण यामुळे पावसात गाड्या ‘स्लीप’ होणे, पर्यायाने वाहनाचे अपघात होणे अशा घटनांमध्येही वाढ होत असते. कल्याण-नगर मार्गावरील ठाणे व पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी अगदी सीमारेषेवर असणारा माळशेज घाट दरडी पडण्यासाठी (कु)प्रसिद्धच आहे. माळशेज घाटात दरवर्षी दरडी ढासळण्याच्या, रस्ते खचण्याच्या घटना घडतच आहेत. पावसाळा कालावधीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी घाट परिसरातील रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. घाटाला लोखंडी जाळीला कव्हर करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे.

पावसाने अजून जोर पकडला नसला तरी माळशेज घाटामध्ये मात्र दरडी कोसळण्याच्या घटनेने सलामी दिलेली आहे. बुधवारी पहाटे कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली. मागील काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक डोंगरकडा पडला. त्यामुळे या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. घाटात पर्यटनांसाठी दरवर्षी वाढणारी पर्यटकांची गर्दी व त्यातून घडणाऱ्या घटनादेखील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतातच; परंतु शांततामय पर्यावरणामध्ये गोंधळ, कोलाहल यामुळे त्या परिसरात घातल्या जाणाऱ्या गोंधळाने तेथील शांततेलाही बाधा आणतात. पाऊस सुरू झाल्यावर माळशेज घाटाकडे पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणावर वळतात. एकीकडे डोंगररांगा तर दुसरीकडे नजरेतही न सामावणारा खोलगट भाग, झाडी, निसर्गसौंदर्य, वन्य प्राण्यांचे दर्शन यामुळे माळशेज घाट वर्षांनुवर्षे पर्यटकांची गर्दी वाढतच चालला आहे.

पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेतला, धबधब्याखाली पाण्याचे फवारे अंगावर घेणे हा पर्यटनाचा, पावसाळी सहलीचाच एक भाग झाला. पण सोबतीला दारू घेऊन जाणे, दारूच्या पार्ट्या करणे, गोंधळ घालणे, सेल्फीच्या नादात नको ते जीवघेणे प्रकार करणे हा सहन करण्यापलीकडचा भाग आहे. पावसाळा कालावधीत डोंगर ढासळतो, दरडी कोसळतात. हे मार्गदर्शनपर फलक असतानाही पर्यटक आपणाला हवे आहे तेच करतात व अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे निसर्गसौंदर्याने बहरलेला माळशेज घाट पावसाळा कालावधीत अपघाताच्या घटनांनी कलंकित होऊ लागला आहे, या घाटाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलीन होऊ लागली आहे. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याच्या बाजूने मुरबाड पोलीस व घाट माथ्यावरून ओतूर पोलीस बंदोबस्ताला असले तरी पर्यटकांच्या संख्येपुढे हा बंदोबस्त अगदी तोकडाच पडतो. तसेच पर्यटक झुंडीने असल्याने व त्यातही काही महाभाग दारूच्या आहारी गेल्याने भांडणे हा नित्याचाच एक भाग झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडवकडा हा अलीकडच्या दशकभराच्या कालावधीत नावारूपाला आलेले पर्यटन स्थळ आहे. नवी मुंबई, पनवेल, उरणपासून हाकेच्या अंतरावर तसेच मुंबई, ठाणे, कल्याणपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असणारे पांडवकडा हे वनडे सहलीसाठी उपयुक्त पर्यटन स्थळ आहे. पाऊस सुरू झाल्यावर तेथे वाहणारा धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. तरुणाई मोठ्या संख्येने दररोज पांडवकडा परिसराकडे येत असते. शनिवारी, रविवारी पावसाळ्यात पांडवकडा परिसरात तरुणाईचा एक महोत्सवच भरलेला दिसून येतो. पांडवकडा धबधब्यामध्ये वरून पाण्यासोबत अनेकदा पडणारे दगड हे दुर्घटनेला निमत्रंण देत असतात. पांडवकडा या ठिकाणीही दारूच्या पार्ट्या होत असल्याने नकळत पाण्यासोबतची मस्ती मृत्यूला निमंत्रण देत असते. पर्यटनासाठी पांडवकडा परिसरात बंदी घातली तरी या बंदीला न जुमानता पर्यटक या ठिकाणी येतच असतात. खारघर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त असला तरी पर्यटकांच्या संख्येपुढे तो तोकडाच ठरतो. घाट, धबधबे या तुलनेत फॉर्म हाऊस, रिसोर्ट्स, हॉटेल व या ठिकाणी असणारे स्विमिंग पूल हा सुरक्षित पर्याय अनेकजण स्वीकारतात.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयापासून उरणच्या दिशेने गेल्यावर काही अंतरावर दिघोडा परिसरातही नदीवर पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. तेथील नदीवर जाऊन वाहत्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या दशकभराच्या कालावधीत येथेही गर्दी वाढू लागली आहे. टिटवाळा, बदलापूर, खडवली या ठिकाणी वाहणाऱ्या नद्यादेखील पर्यटकांना साद घालतच असतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोसळणारे पाण्याचे धबधबे अंगावर घेण्यासाठी चालक आपली वाहने बाजूला उभी करत असल्याने एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीच्या घटना घडतच असतात. याशिवाय पावसातील कोकण म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर नंदनवनच आहे. पावसाळा सुरू झाला की वर्षासहलीपासून ते दुर्गभटकंतीपर्यंत स्वतःच्या कुवतीनुसार अनेक बेत रचले जातात. ठोसेघर, राजमाची, कोंढाणेलेणी, आंबोली, कास, कात्रज, सिंहगड, नाणेघाट, हरिश्चंद्रगड इ. भटक्यांची काही आवडीची ठिकाणे.

पावसामुळे डोंगर हिरवेगार झालेले असतात, डोंगरावरून धबधबे वाहत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे नटलेली असतात. सर्वत्र वातावरण कसे आल्हाददायक असते. अशा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत असतानाच अमूक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे पर्यटकाचा मृत्यू, धबधब्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक वाहून गेले, अशा घटनांनी पावसाळी पर्यटनाला अलीकडच्या काळात गालबोट लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अलीकडच्या काळात पावसाळा कालावधीत ट्रेकिंगच्या प्रकारातही वाढ झाली आहे. ट्रेकिंगला जाताना पाऊस, दाट धुके, उंच डोंगर, खोलदऱ्या, निसरड्या वाटा आणि चिखल यांचा विचार केला गेलेला असतो. कौटुंबिक सहलीसाठी आपण आपल्या परिवाराबरोबर अशा ठिकाणी वरील गोष्टी विचारात न घेता जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे आपण पावसाळ्यात भटकंतीसाठी बाहेर पडतो, त्याचप्रमाणे अनेक सरपटणारे प्राणीपण बिळात पाणी शिरल्यामुळे बाहेर पडतात. त्यामुळे भटकंती करताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून विशेष काळजी न घेतल्यास सर्पदंशाने मृत्यू होण्याच्या घटनाही घडत असतात, पावसाळा कालावधीत आसंमत हा नव्याने कात टाकत असतो. मग अशा निसर्गात रममाण होताना काळजी घेतल्यास पाऊसाला व पर्यटनालाही गालबोट लागणार नाही.

Recent Posts

पक्ष विरोधी कारवाया केल्या प्रकरणी कुंडलीक खांडेंची हकालपट्टी; तर दुसऱ्या प्रकरणात कोर्टाकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी

बीड : पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल…

1 hour ago

Fire News : भीषण स्फोट! गॅस रिफिलिंग करताना झोपडपट्टीत मोठी आग

परिसरात धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी टळली पुणे : पुण्यात आज पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने…

3 hours ago

Recharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी दरवाढ

जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि…

4 hours ago

CM Eknath Shinde : राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ लागू करणार!

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुंबई : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session…

4 hours ago

Virar Waterfall : विरारमध्ये धबधबा शोधताय? आ जाओ बॉस दिखा देंगे…

मुंबई : मुंबई शहरातील विरार हे एक गजबजलेले उपनगर आहे. मुंबईत असले तरीही अनेकजण या…

5 hours ago

Vicky Kaushal : कतरिना प्रेग्नंट आहे का? अखेर विकी कौशलने पॅपराझींच्या प्रश्नाला दिलं उत्तर!

लवकरच येणार 'ती' न्यूज... मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान…

5 hours ago