
प्रशासनाच्या कामाबाबत वारकऱ्यांचा असंतोष
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासनाकडून आळंदी ते पंढरपूर असा हजारो कोटी रुपये खर्च करून नव्याने मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र वेळापूर ते वाखरी मार्गावर दसूर येथे हा मार्ग खचला असल्याची माहिती मिळत आहे. अवघ्या दीड वर्षात सदर काम गुणवत्तापूर्ण न झाल्याने पालखी मार्ग खचल्याने प्रशासनाच्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीची वारी सुखकर व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर असा नवा पालखी मार्ग तयार केला होता. मात्र माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले ते वेळापूर दरम्यान २०० मीटर रस्ता ६० फूट खोल खचला आहे. या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
पालखी मार्गावरील हा महामार्ग खचल्याची माहिती मिळताच, तातडीने प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आषाढी यात्रा काळात कोणताही धोका होऊ नये यासाठी प्रशासन गंभीर असले तरी इतक्या अल्पावधीत हा मार्ग कसा खचू लागला असा प्रश्न वारकरी व भाविकांतून उपस्थित होऊ लागला आहे. .
प्रशासनाकडून काम सुरू
पालखी मार्ग खचल्याच्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक लावून या भागातील माती व मुरूम काढण्यात आले आहे. पावसाळा सुरू असतानाही आता या भागाची दुरुस्ती तातडीने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढीसाठी पालखी मार्गावर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होता कामा नये असे आदेशच प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी पंढरपूरहून वेळापूरकडे जाणारी एक लेन ३ किलोमीटरपर्यंत बंद करण्यात आली आहे.
वारकऱ्यांमध्ये असंतोष
आषाढी वारीला पुढील काही दिवसांत सुरुवात होणार असून पालखी प्रस्थानाला काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. मात्र, अशा पद्धतीने नव्याने बनविलेला पालखी मार्ग खचल्याने वारकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानाच्या पालख्या पंढरपूरकडे करणार प्रस्थान ठेवणार असून त्यापूर्वीच प्रशासनाला ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.