नवी दिल्ली: इटलीमध्ये ग्रुप ऑफ सेव्हन म्हणजेच जी७ देशांची बैठक होत आहे. यावेळेस जी७ शिखर परिषदेचे आयोजन १३ ते १५ जूनपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये पोहोचले आहेत. शिखर परिषदेदरम्यान भारत एआय, उर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय क्षेत्र यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
या परिषदेत युक्रेनसोबत सुरू असलेल्या भीषण युद्ध आणि गाझापट्टीच्या संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर असणार आहे. पंतप्रधान मोदी जी७ शिखर परिषदेत आऊटरीच सत्रात भाग घेणाऱे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, इटलीचे जॉर्जिया मेलॉनीसह अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षी बैठक करण्याची शक्यता आहे.
या देशासंबोत ते सुरक्षा आणि व्यापार सारख्या मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. इटलीच्या आपुलिया भागातील बोर्गो एग्नाजियाच्या अलिशान रिसॉर्टमध्ये होणाऱ्या जी७ शिखर परिषदेत जागतिक मुद्दयांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य केले जाणार आहे. जी७मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश आहे.