
ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अमरावती : मुंबई मालाड येथे आईस्क्रीममध्ये मानवाचे बोट आढळल्याची घटना जवलंत असताना अशीच आणखी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. अमरावती मधील एका हॉटेलमध्ये कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कॉफी पिणाऱ्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही. मात्र सततच्या वाढत्या अशा प्रकरणामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉफी पिताना ग्राहकांच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. कॉफी पिताना अचानक काचेचे तुकडे दिसल्याने ग्राहकाने तीव्र संतापला व्यक्त केला. या प्रकरणी तरुणांनी हॉटेल संचालकाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनात तक्रार केली आहे. त्यासोबत हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नेमके काय घडले?
अमरावतीमधील सुमेध इंगळे आणि अभिजीत वानखेडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरातील एनसीसीस कॅन्टीन समोरील एका हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. काही वेळानंतर दोन्ही युवकांना कॉफी देण्यात आली. यावेळी कॉफी पिताना दोन्ही युवकांना ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळले. त्यानंतर कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉटेल संचालकांना जाब विचारला. सुदैवाने दोन्ही युवकांना कोणताही त्रास झाला नसून हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे म्हटले.