Saturday, June 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान

आषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. ही मागणीही सरकारने मान्य केली आहे. तसेच वारकऱ्यांना अपघात गट विमा, वाहनांना टोलमाफी या सवलती यंदाही लागू राहणार आहे.

पंढरपुर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्व नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या निर्णयाचे बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायाने टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.

या बैठकीस आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मिलिंद म्हैसकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ग्राम विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ बंडातात्या कराडकर, अक्षयमहाराज भोसले, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त ॲड. माधवी निगडे-देसाई, यांच्यासह मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथमहाराज औसेकर, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आहे. सरकारने कमी वेळात शेतकरी, माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतले आहेत. आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह, विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालयातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्दैवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी एसओपी निश्चित केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -