Monday, July 22, 2024
Homeक्राईमCanara Bank : खोटे सोने तारण ठेवून कॅनरा बँकेची तब्बल ८६ लाखांची...

Canara Bank : खोटे सोने तारण ठेवून कॅनरा बँकेची तब्बल ८६ लाखांची फसवणूक!

काय आहे प्रकरण?

सोलापूर : कॅनरा बँकेच्या सोलापूरच्या शाखेची (Solapur Canara Bank) फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये खोटी कागदपत्रं व खोटे सोने (Fake gold) दाखवून तब्बल ८६ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. कॅनरा बँकेच्या चार शाखांतून गेल्या तीन महिन्यांपासून हा फसवणुकीचा प्रकार (Fraud) चालला होता. या प्रकरणी कॅनरा बँकेतील अधिकृत सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनारासह १४ जणांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून, खोटी कागदपत्रं दाखवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह सात रस्ता, चाटी गल्ली आणि मजरेवाडी या चार शाखांमध्ये गेल्या १ फेब्रुवारी ते २८ मे या कालावधीत हा प्रकार घडला. कॅनरा बँकेचे चीफ मॅनेजर अनिलकुमार शहापूरवाड यांनी जोडभावी पेठ पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली आहे.

बँकेतील सोनारासह संगनमत करून १३ बनावट खातेदारांनी ही खोटी कागदपत्रं सादर केली होती. सोनार सुनील नारायण वेदपाठक याच्यासह खातेदार जावेद वजीर सय्यद, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सारसंभी, जुबेर जहागीर मुल्ला, भुजंग सुनिल शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनोद्दीन शेख, सोमनाथ मधूकर शेळके, सरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण, उत्तरेश्वर मल्लीकार्जुन बोबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील सुनील वेदपाठक सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या चार शाखांसाठी मानधन तत्वावर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते. सोने तारण कर्जावरील सोन्याची शुद्धता तपासणे, वजन करणे, त्याबाबत बँकेकडील पासवर्डचा फॉर्म स्वहस्ताक्षरात प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविण्यात आल्या होत्या. परंतु सुनील वेदपाठक याने संबंधित इतरांशी संगनमत करून बँकेच्या चारही शाखांमध्ये २२५५ ग्रॅम बनावट सोने खरे आणि शुद्ध असल्याचे प्रमाणित करून एकूण ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -